माझ्या मतदारसंघात कॅनॉलचे पाणी वहात आहे, ऊसाची बागायती शेती होत आहे, कारखान्यांची धुराडी पेटली आहेत-जयकुमार गोरे
येणाऱ्या तीन वर्षानंतर माझ्या मतदारसंघाला दुष्काळी म्हणायची कुणाची हिम्मतच होणार नाही – आ.जयकुमार गोरे
सातारा प्रतिनिधी- गेल्या १५ वर्षात जनतेला शब्द दिल्याप्रमाणे उरमोडी, तारळी, जिहेकठापूरचे पाणी माण – खटावमध्ये आणले आहे. वंचित गावांसाठीच्या ७५० कोटींच्या टेंभू योजनेची कामे सुरु झाली आहेत. जिहेकठापूरची वाढीव आंधळी उपसा योजना पूर्णत्वाला निघाली आहे. औंधसह २१ गावांची योजना राज्यपालांकडे मंजूरीला पाठवली आहे. इतकी सगळी कामे झाल्याने येणाऱ्या तीन वर्षानंतर माझ्या मतदारसंघाला दुष्काळी म्हणायची कुणाची हिम्मतच होणार नाही असा विश्वास आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. मतदारसंघातील १८७ गावांमध्ये कोट्यवधींच्या विकासकामांचे माझे बोर्ड एकही विकासकाम न करणाऱ्या प्रभाकर घार्गेंना चपराक ठरत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
सिध्देश्वर कुरोली येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आ. जयकुमार गोरे पुढे म्हणाले, माझ्या तीन ओळींच्या जाहीरनाम्यात माण – खटावचे भाग्य बदलण्याची क्षमता होती ते सध्या दिसून येत आहे. माझ्या मतदारसंघात कॅनॉलचे पाणी वहात आहे, ऊसाची बागायती शेती होत आहे, कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. आता जगाशी स्पर्धा करायला सज्ज होताना महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत उभी रहात आहे. शैक्षणिक क्रांतीच्या दिशेने आम्ही पाऊल टाकत आहोत. मी १५ वर्षात रात्रंदिवस परिश्रम करुन माझ्या मायबाप जनतेची इमानेइतबारे सेवा केली. कार्यकर्त्यांनी आणि जनतेने सांगितलेली सर्व कामे मार्गी लावली. तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करुन त्यांना व्यसनांपासून दूर ठेवले. चळवळीतील कार्यकर्त्यांची मजबूत फळी गावोगावी उभी केली. मी अहंकारी नाही तर स्वाभिमानी आहे. कामाच्या जोरावर सन्माने मला निवडणूकीचे तिकीट मिळाले. विरोधकांसारखी मला दोन महिने लाचार बनून बारामतीकरांचे तळवे चाटावे लागले नाहीत. मी माझ्या मातीचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी प्राणपणाने पाण्यासाठीची लढाई लढलोय.
आ. गोरे पुढे म्हणाले, माझ्या विरोधी अमचंठरलय टीममधील सर्वजण विकले गेले आहेत. व्यवहार फिस्कटल्याने ते एकमेकांच्या अंगावर धावून जात तमाशा करत आहेत. प्रभाकर देशमुखांना पराभव दिसल्यानेच त्यांनी अंग काढून घेतले. ज्यांचे आयुष्य तडजोडीत गेले ते प्रभाकर घार्गेंनी एखाद्या गावात केलेले विकासकाम किंवा त्यांचा राजकीय पक्ष कोणता ते सांगावे. त्यांना विधानपरिषद, जिल्हा बॅंकेसाठी बिनविरोध निवडून देण्यासाठी मदत केली. तुरुंगात असतानाही मदत केली. मार्केट कमिटी निवडणूकीत सहकार्य केले, मात्र त्यांनी आणि त्यांच्या टीमने बारामतीची दुकानदारी सुरु ठेवली आहे. कार्यक्रमात औंध गटातील अनेक विरोधी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
घार्गेंमुळेच औंधची पाणीयोजना रखडली …..
सध्या सुरु असलेली लढाई जयकुमार किंवा घार्गेंची नाही. व्यक्तीगत कुणाच्या नावापुरती अस्मितेची नाही. ही लढाई मतदारसंघाच्या दुष्काळमुक्तीची आहे. माण – खटावच्या अस्मितेची आहे.
घार्गे कधीच पाणीचळवळीत दिसले नाहीत. अकरा वर्षांपूर्वी औंध पाणीयोजनेसाठी झालेले उपोषण श्रेयवादातून सोडवल्यानंतर ते कधीच प्रयत्नशील दिसले नाहीत. त्यांच्यामुळेच या योजनेला उशीर झाला असला तरी औंधसह २१ गावांना आम्हीच पाणी देणार असल्याचा विश्वास आ. गोरेंनी व्यक्त केला.