कराड तालुक्यातील मसूरमध्ये पॉलिशच्या बहाण्याने सोन्याच्या बांगड्या लंपास पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोरट्यांचा पोबारा
कराड ( ज्ञानेश्वर शेवाळे )-मसूर येथील शिवाजीनगर परिसरात गुरुवार दि. १६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास भर दिवसा भर वस्तीत घडलेल्या धक्कादायक प्रकारात, पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेच्या साडेतीन तोळ्यांच्या साडेचार ते पाच लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्यांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. मसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने पोलिसांच्या समोर चोरट्याने एक आव्हानच उभे केले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथे राहणाऱ्या सुनिता मोहन शेडे (वय ६३) यांच्या घरी स्प्लेंडर मोटारसायकलवरून आलेले ३० ते ३५ वयोगटातील दोन युवक आले. पांढरा शर्ट, काळी पॅन्ट व डोक्यावर टोपी असा त्यांचा वेश होता. त्यांनी तांब्याची भांडी व सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो, त्यावर पावडर मोफत देतो असा बहाणा करत घरात प्रवेश केला.
सुरुवातीला त्यांनी देव्हा-यातील पत्र्याचा देव तसेच तांब्याची भांडी पॉलिश करून दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर शेडे यांच्या हातातील बांगड्या सोन्याच्या आहेत का, हे तपासण्यासाठी पॉलिश करून देतो असे सांगून त्या काढून घेतल्या, त्यांनी एका भांड्यात गुलाबी रंगाचे द्रावण तयार करून त्यामध्ये बांगड्या टाकल्या व ते भांडे गॅसवर ठेवले. दरम्यान, काही प्रक्रिया करायची आहे.
असे सांगून त्यांनी शेडे यांना क्षणभर मागे वळवले आणि त्याच वेळी चलाखीने बांगड्या लंपास केल्या, संबंधित युवक घराबाहेर गेल्यानंतर शेडे यांनी भांड्यात पाहिले असता बांगड्या गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत आरोपी मोटारसायकलवरून पसार झाले होते. विशेष बाब म्हणजे भर दिवसा घटना घडवून सुद्धा संबंधित यंत्रणेने नाकाबंदी केली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे
या घटनेची नोंद मसूर पोलीस ठाण्यात करण्यात आली.असून पुढील तपास सुरू आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत चोरट्याने पळ काढण्यात यश मिळवले भर दिवसा लाखो रुपयाचा सोन्याचा ऐवज घेऊन लंपास करणाऱ्या चोरट्यांनी मसूर पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे.
नागरिकांनी सावध राहावे…
मसूरचे सहायक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून परिसरातील गावांना सदर घटनेची माहिती देऊन सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.




