संकटात बळीराजाला हातभार: माजी सरपंच रवींद्र सल्लक यांची समाजापुढे प्रेरणा
मेढा प्रतिनिधी:आजच्या काळात वाढदिवस म्हटले की अवास्तव खर्च ,बडेजावपणा ,पैशांची वारेमाप उधळपट्टी हे सर्वमान्य झाले आहे. मात्र आपल्या वाढदिवसादिवशी अवास्तव खर्चाला फाटा देऊन येथील माजी सरपंच रवींद्र सल्लक यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सामाजिक बांधीलकीतून अकरा हजार रुपयांची मदत आज सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीस भेट दिली.
यावेळी केळघर सोसायटीचे अध्यक्ष सुनील जांभळे यांची उपस्थिती होती. श्री. सल्लक यावेळी म्हणाले, या वर्षी पडलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा पूर्णपणे अडचणीत आला असून या शेतकऱ्यांना समाजातील विविध घटकांनी स्वतः हुन मदत केली पाहिजे .त्यामुळे वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सल्लक परिवाराच्या वतीने शेतकऱ्यांना मदत म्हणून अकरा हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला भेट दिली आहे. यावेळी सल्लक यांनी दाखवलेल्या या सामाजिक बांधीलकीचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह मान्यवरांनी कौतुक केले.




