पुन्हा येईन म्हणालो होतो मी पुन्हा आलोच
सातारा- (अली मुजावर )जिद्द, संयम आणि राजकीय डावपेचाच्या जोरावर फडणवीस तरले आणि राजकारणाच्या सारीपाटावर पुन्हा झळाळून उभे राहिले . ‘मी पुन्हा येईन’ असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस खरोखरच पुन्हा आले. आता ते महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील.
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाची झलक महाराष्ट्राला पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. त्यांच्या कल्पक नेतृत्वात एकट्या भाजपने 132 जागा तर जिंकल्याच महायुतीनेही 234 ठिकाणी विजय मिळवला. पण ही कमाल काही पहिल्यांदाच नाही. तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपने 2014, 2019 आणि आता 2024 साली, सलग तीन वेळा 100 हून अधिक जागा जिंकण्याची किमया केलीय. लोकसभेच्या निवडणुकीत फटका बसल्यानंतर फडणवीस संपले अशी चर्चा सुरू झाली होती. संयमी फडणवीसांनी चाणाक्ष खेळी केली आणि अवघ्या चारच महिन्यात जोरदार कमबॅक केले.देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदासाठी पाच वर्षांची वाट पाहावी लागली आहे. 2019 साली पूर्ण बहुमत मिळालं असतानाही उद्धव ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतली आणि फडणवीसांना विरोधी पक्षात बसावं लागलं होते.