हिवाळी अधिवेशनात 10 डिसेंबरला पोलीस पाटील काढणार मोर्चा
कराड-(प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघ तसेच विविध सहयोगी संघटनांच्यावतीने 10 डिसेंबरला पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नागपुरमध्ये भव्य मोर्चा काढला जाणार आहे. संघाच्या तालुकाध्यक्षांनी या मोर्चात जास्तीत जास्त पोलीस पाटील सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत. मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष अमित शिंदे-पाटील यांच्यासह पदाधिकार्यांनी केले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राज्य संघटक भाऊसाहेब पाटील, खान्देश अध्यक्ष प्रवीण गोसावी, राज्य सदस्य लीलाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहयोगी संघटनांच्या सहयोगाने हा मोर्चा काढला जाणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपुर्वी सर्व विभागातील सचिवांच्या उपस्थितीत मुंबई मंत्रालयात बैठक झाली होती. त्यावेळी मागण्या मांडताना बाळासाहेब शिंदे पाटील यांनी वयोमर्यादा साठवरून 65 करावी, या प्रमुख मागणीसह नुतणीकरण बंद करावे, सेवानिवृत्तीनंतर पोलीस पाटील यांना एकरकमी पैसे द्यावे, विमा कवच तसेच पोलीस पाटील अधिनियमात दुरुस्ती अशा अनेक मागण्यांसंदर्भात चर्चा केली. यावर उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी प्रस्ताव पाठविण्यासाठी सचिवांना सूचना दिल्या होत्या. त्यावर मंत्रिमंडळाने लवकरच निर्णय घ्यावा, यासाठी पोलीस पाटील यांची एकजूट हिवाळी अधिवेशनात दाखविणे गरजेचे आहे.
मंत्रिमंडळाला या मागण्यांबाबत निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी सर्व पोलीस पाटील यांनी या मोर्चात सहभागी व्हावे. घरी बसून आपल्या पदरात काहीच पडणार नाही. एकजूट करून संघाचे नेते बाळासाहेब शिंदे-पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी ताकद उभी करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अमित शिंदे-पाटील व सर्व जिल्हा पदाधिकार्यांनी केले आहे.




