महाड पोलादपूर येथे मुसळधार पाऊसाचा कहर
गेल्या 48 तासांपासून महाड पोलादपूरच्या सर्व भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील 24 तासात पावसाचा जोर असाच चालू राहिल्यास अथवा वाढ झाल्यास पुराची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान तालुक्यातून वाहणाऱ्या सावित्री, काळ, गांधारी या नद्या दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
दरम्यान सध्या सुरू असलेल्या या मुसळधार पर्जन्यवृष्टीने दोन्ही तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या रस्त्यावर माती खाली येण्याच्या घटना समोर येत आहेत. पावसाचा मारा असा सुरू राहिल्यास या दोन्ही तालुक्यांवर पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचे ढग घोंगावू लागत असल्याची भीती निर्माण झाली आहे.
गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसाची नोंद स्थानिक प्रशासनाने घेतली असून, एन डी आर एफ चे पथक कोणत्याही क्षणी आलेल्या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती महाड प्रशासनाने दिली आहे.
भारतीय वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात सोमवार, मंगळवार पासूनच महाड पोलादपूर तालुक्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता.
गेल्या 24 तासात महाड तालुक्यात झालेल्या 123 मिलिमीटर पावसाने ११६४ मिलिमीटर पावसाची नोंद केली असून, पोलादपूर मध्ये मागील 24 तासात 125 मिलिमीटर पाऊस झाला असून तो आज पर्यंत 1223 मिलिमीटर एवढा पडल्याची माहिती महाड व पोलादपूर तहसील कार्यालयातून आपत्ती निवारण कक्षातून महाड पोलादपूर मध्ये पुराची शक्यता निर्माण होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
