मेहनत आणि जिद्दीनेच लक्ष्मीची पाऊले आपल्याकडे वळतात विसाव्या जागतिक मराठी संमेलनात उद्योजकांनी उलगडल्या यशोगाथा
सातारा प्रतिनिधी –जागतिक मराठी अकादमी आणि सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘शोध मराठी मनाचा’ या विसाव्या जागतिक मराठी संमेलनातील प्रथम सत्रात प्रतिथयश उद्योजकांनी आपला प्रेरणादायी जीवन प्रवास उलगडून दाखवला.
या मुलाखत सत्रात ज्येष्ठ उद्योजक व कूपर उद्योग समूहाचे फारुक कूपर, नवी मुंबईच्या विकासाचे शिल्पकार ज्येष्ठ उद्योगपती रामशेठ ठाकूर, थर्माकॉल मॅन रामदास माने व बीव्हीजीचे प्रमुख हणमंतराव गायकवाड उपस्थिती होती.मान्यवर उद्योजकांच्या यशोगाथा उलगडून दाखवण्याचे काम सुप्रसिद्ध पत्रकार महेश म्हात्रे यांनी केले.
ज्येष्ठ उद्योजक फारुक कूपर यांनी परदेशात शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा भारतात येण्याची प्रेरणा आपल्या संस्कृतीने दिल्याचे गौरवोद्गार काढले. भारत हा प्रामाणिक लोकांचा देश असून ते कष्टाळू लोक परदेशात मिळणे अवघड आहे. आपल्या माणसांच्या गुणवैशिष्ट्यांना संधी उपलब्ध करून दिली तर आपली प्रगती शक्य आहे. आज घडीला वीस माणसांच्या सोबत सुरू केलेला उद्योग समूह चार हजार लोकांचा झाला असून आपल्या शासनाच्या साथीनेच ही प्रगती शक्य झाली, असेही ते म्हणाले. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत शिक्षण संस्थेशी कूपर कुटुंबाचा असलेला शतकांचा स्नेहबंध उलगडून दाखवताना ते भावूक झाले.
रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेतील कमवा व शिका योजनेचा विद्यार्थी, कर्मवीर भाऊराव पाटील , प्रा. डॉ. एन. डी. पाटील, प्राचार्य बापूसाहेब उणवणे यांच्या सहवासात झालेली जडणघडण, शिक्षक म्हणून आयुष्याला केलेली सुरुवात आणि आज सुमारे एक हजार कोटींचे उभे राहिलेले अफाट विश्व असा थक्क करणारा प्रवास कथन केला.
थर्माकॉल मॅन रामदास माने यांनी लोधवडे या दुष्काळी गावापासून सुरू झालेला आपला प्रवास कथन करताना आयुष्यात आलेले खचखळगे कथन केले. शिक्षण घेताना आलेले अडचणी , रोजगार हमीच्या कामावर वह्या पुस्तकांसाठी केलेली नोकरी, आयटीआय करताना रात्री केलेले वेटरचे काम असा संघर्ष करत पुढे पुढे पाऊले टाकले आज भारतातील ९०% थर्माकॉल बनवण्याचे करत असलेले काम असा थक्क करणारा प्रवास उपस्थितांना प्रेरणादायी ठरला.
हणमंतराव गायकवाड यांनी बीव्हीजी ग्रुपच्या निर्मितीची आगळीवेगळी आणि समाजाची दृष्टी बदलून टाकणारी जन्मकथा सांगितली. स्वच्छतेच्या कामाला समाजाच्या दृष्टीने उच्च दर्जा प्राप्त करून देण्याची कामगिरी केल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
आज भारतासह गायकवाड यांचा उद्योगसमूह जगभरात पोहोचला असून अमेरिकेतही काम सुरू आहे. दहा लाख रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवून हे पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याची वाटचाली सुरू असून पारंपरिक दृष्टिकोन नाकारा,असेही गायकवाड म्हणाले.
सर्व उद्योजकांचे स्वागत व सन्मान रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे व संस्थेचे सचिव, माजी सनदी अधिकारी विकास देशमुख यांनी केले.