गुरू ग्लोबल स्कूलचा कार्निव्हल: डॉ.त्रिपाठी यांनी शाळेची प्रशंसा केली
महाबळेश्वर: महाबळेश्वर येथील गुरू ग्लोबल स्कूलने 28 तारखेला आयोजित केलेल्या कार्निव्हलमध्ये विद्यार्थ्यांच्या कला, संस्कृती आणि खेळांची विविध रंगीबेरंगी झलक उमटली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेचे पृथ्वी आणि हवामान विज्ञान विभागाचे अध्यक्ष डॉ. ज्ञानरंजन त्रिपाठी उपस्थित होते.
डॉ. त्रिपाठी यांनी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांसाठी चांगल्या वातावरणाची निर्मिती केल्याबद्दल प्रशंसा केली. त्यांनी म्हटले की, “गुरू ग्लोबल स्कूल विद्यार्थ्यांना शिक्षण, कला, क्रिडा अशा सर्वच क्षेत्रांचा परीचय बालवयातच घडवून आणत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आहे आणि ते देशाची भावी पिढी सक्षम करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.”
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेश्मा बेगम यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करत मागील वर्षी शाळेने केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, “वार्षिक कार्निव्हल हा विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे प्रतीक आहे.”
नर्सरी ते ज्युनियर केजीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी नृत्य, संगीत आणि नाटकांच्या सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एकता, चिकाटी आणि नाविन्य या मूल्यांवर भर दिला.
कार्यक्रमात मागील वर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ. त्रिपाठी यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्रिशा सुशिल खेडेकर आणि मोहमंद जेन परवेज पटेल या दोन विद्यार्थ्यांना ‘अकॅडमिक एक्सेलन्स’ पुरस्काराने गौरवण्यात आले. शिवन्या कदम हीला ‘टॉप अटेंडन्स’ आणि लुजेन पटेल हीला ‘स्पोर्ट्स क्वीन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमात सोसायटीचे अध्यक्ष कोंडीबा आखाडे, सचिव फकीर वलगे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.