प्रतापगडच्या पायथ्याशी उभारणार वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक; पर्यटन विभागाकडून १ कोटींचा निधी मंजूर

महाबळेश्वर:स्वराज्य रक्षक वीर जिवाजी महाले यांच्या पराक्रमाची स्मृती चिरंतन राहावी, यासाठी प्रतापगडच्या पायथ्याशी एक भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी पर्यटन विभागामार्फत १ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
नितीनजीराजे शिंदे यांच्या हस्ते मंत्र्यांचा सत्कार
या निधी उपलब्धतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे माजी आमदार आणि प्रतापगड विकास प्राधिकरणाचे निमंत्रित सदस्य नितीनजीराजे शिंदे यांनी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेतली. यावेळी नितीनजीराजे शिंदे यांनी शंभूराजे देसाई यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला आणि या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानले.
स्मारक उभारणीसाठी प्राधिकरणाची धोरणात्मक पावले
प्रतापगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्मारक उभारले जाणार आहे. पर्यटन विभागाच्या जागेत हे स्मारक साकारणार असून, यासाठी आवश्यक असलेला १ कोटींचा निधी शासनाने मंजूर केल्याने आता कामाला गती मिळणार आहे.
या सत्कारप्रसंगी प्रतापगड विकास प्राधिकरणाचे निमंत्रित सदस्य मिलिंद एकबोटे, विजय नायडू, काका धुमाळ, अमोल जाधव यांच्यासह प्राधिकरणाचे इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीर जिवाजी महाले यांचे हे स्मारक पर्यटनाच्या दृष्टीने आणि इतिहासाच्या जतनासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.




