Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये कुपर कॉर्पोरेशनचे डॉ. नितीन देशपांडे यांची सदिच्छा भेट

यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये कुपर कॉर्पोरेशनचे डॉ. नितीन देशपांडे यांची सदिच्छा भेट

यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये कुपर कॉर्पोरेशनचे डॉ. नितीन देशपांडे यांची सदिच्छा भेट

उद्योग–शिक्षण संस्थेतील सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी : डॉ. नितीन देशपांडे 

सातारा : यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथे कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि.चे मुख्य मानव संसाधन अधिकारी (सीएचआरओ) तसेच यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या व्यवस्थापन विद्याशाखेच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. नितीन देशपांडे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. अजिंक्य सगरे यांच्यासोबत उद्योग–शिक्षण संस्था सहकार्य, कौशल्य विकास, रोजगारक्षमता आणि भविष्योन्मुख अभियांत्रिकी शिक्षण या विषयांवर सविस्तर व विधायक चर्चा करण्यात आली.

बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर उद्योग क्षेत्राच्या गरजा सातत्याने बदलत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित तंत्रज्ञान, डिजिटलायझेशन, इंटरनेट ऑफ थिंग्ज, रोबोटिक्स आणि आधुनिक उत्पादन प्रणाली यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात रोजगाराच्या स्वरूपात मोठे बदल होत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमाधारित ज्ञान न देता उद्योगाच्या गरजांनुसार आवश्यक कौशल्ये, व्यावहारिक अनुभव आणि व्यावसायिक दृष्टिकोन देणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

डॉ. नितीन देशपांडे यांनी उद्योग क्षेत्रातील मनुष्यबळाच्या बदलत्या गरजा आणि विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणे आवश्यक असलेल्या कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानाबरोबरच संवादकौशल्य, समस्या सोडविण्याची क्षमता, संघभावना, नेतृत्वगुण, वेळेचे व्यवस्थापन आणि सतत शिकण्याची वृत्ती विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उद्योग क्षेत्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि व्यावसायिक दृष्टिकोन महत्त्वाची भूमिका बजावतात, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी प्रा. डॉ. अजिंक्य सगरे यांनी उद्योग–शिक्षण संस्था सहकार्याला यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या शैक्षणिक वाटचालीत विशेष महत्त्व असल्याचे सांगितले. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद, प्रत्यक्ष प्रशिक्षण, औद्योगिक भेटी, इंटर्नशिप, प्रकल्पाधारित शिक्षण आणि रोजगाराभिमुख उपक्रम यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना अधिक व्यापक दिशा मिळते, असे त्यांनी नमूद केले.

यशोदा टेक्निकल कॅम्पस स्वायत्त संस्था म्हणून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि उद्योगाभिमुख शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. अभ्यासक्रमाची रचना करताना उद्योगाच्या गरजा, नवीन तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या बदलत्या संधी यांचा विचार करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावरील रोजगाराच्या संधींसाठी सक्षम करण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या भेटीदरम्यान भविष्यात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कौशल्य विकास कार्यक्रम, प्रशिक्षण उपक्रम, उद्योगाभिमुख प्रकल्प तसेच विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमता वाढविण्यासाठी विविध सहकार्याच्या शक्यतांवरही चर्चा झाली. सहसंचालक डॉ. रणधीरसिंह मोहिते, प्लेसमेंट ऑफिसर अभिजीत केकरे, कुपर कॉर्पोरेशनचे महेश खरे यावेळी उपस्थित होते.

यशोदा टेक्निकल कॅम्पस आणि कूपर कॉर्पोरेशन यांच्यातील अशा प्रकारचा संवाद विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाशी जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, “शिक्षणातून कौशल्याकडे आणि कौशल्यातून रोजगाराकडे” या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket