महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील जनतेसाठी आनंदाची बातमी! नालासोपारा ते झांझवड एसटी बस पुन्हा सुरू होणार
प्रतापगङ;, ५ जुलै २०२४: महाबळेश्वर तालुक्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या ७-८ दिवसापासून बंद असलेली नालासोपारा ते झांझवड एसटी बस पुन्हा सुरू होणार आहे.
महाबळेश्वर तालुका कोयना खोरे विकास मंडळ मुंबई या संस्थेच्या पदाधिकारी मंडळींनी नालासोपारा बस डेपो मध्ये भेट देऊन एसटी बस पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. यावेळी संस्थेचे संस्थापक सरचिटणीस श्री गोविंद रावजी मोरे, कोशाध्यक्ष श्री बबन मालुसरे आणि संचालक श्री मारुती जाधव उपस्थित होते.
एसटी महामंडळाच्या आगर व्यवस्थापक शानफ मॅडम यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच बस सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील, विशेषतः पश्चिम भागातून मुंबईला जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. या भागातून मुंबईला जाण्यासाठी हीच एकमेव एसटी बस होती आणि त्यामुळे बस बंद झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता.
महाबळेश्वर तालुका कोयना खोरे विकास मंडळ यांनी नागरिकांच्या या समस्येचे त्वरित निराकरण करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.