जीवनात देशहिताला प्राधान्य द्या श्री. नागेश पाटील निवासी उपजिल्हाधिकारी, सातारा
कृषी महाविद्यालय, कराड येथे वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहात संपन्न
महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांनी देशाचा आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देश सर्वांत महत्वाचा आहे आणि म्हणूनच जीवनात कोणतेही कार्य करीत असताना देशहिताला प्रथम प्राधान्य द्या असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी श्री. नागेश पाटील यांनी केले. कृषी महाविद्यालय, कराड येथे दिनांक १३/०७/२०२४ आयोजित वार्षिक पारितोषिक समारंभाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी पाटील, कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सतिश बुलबुले, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. ज्योती वाळके, शारीरिक शिक्षण निदेशक डॉ. नंदकिशोर टाले व विद्यार्थी परिषदेची कार्याध्यक्ष कु. श्रुती देसाई उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना श्री. पाटील पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे ध्येय ठेवले पाहिजे व ध्येयप्राप्तीसाठी योग्य नियोजन करून अथक प्रयत्न केले पाहिजेत. ध्येय प्राप्ती करीत असताना अपयश आले तरी निराश न होता प्रयत्न करीत राहणे आवश्यक असते. कठोर परिश्रम, चिकाटी, प्रामाणिकपणा व सचोटी असणा-या व्यक्तीला यशाची निश्चितच प्राप्ती होते स्पर्धेला सामोरे जाताना ज्ञानाबरोबरच भाषाप्रभूत्व, शारीरिक क्षमता, अभ्यासातील सातत्य या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. विद्यार्थ्याना आज विविध क्षेत्रात संधी उपलब्ध असून त्यांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे असे मत श्री. पाटील यांनी व्यक्त केले. सामजिक मुल्ये व भावनाप्रधानता या गोष्टींची जपणूक होणे गरजेचे आहे. समाजाचा एक घटक म्हणून समाजहितासाठी प्रत्येकाने कार्य केले पाहिजे. विशेषत: कृषी शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची जबाबदारी मोठी आहे. त्यांनी शिक्षण घेऊन शेतक-यांच्या समृद्धीसाठी कार्य केले पाहीजे. श्री. पाटील यांनी याप्रसंगी बक्षिसप्राप्त सर्व विद्यार्थांचे अभिनंदन केले. त्याचवेळी जे विद्यार्थी यशापासून दूर राहिले अशा सर्व विद्यार्थ्यांनी हार न मानता पुढील यशासाठी प्रयत्न करावेत असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
डॉ. शिवाजी पाटील यांनी कृषी महाविद्यालयातीलविद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले व त्यांच्या यशाचा सार्थ अभिमान महाविद्यालयास असल्याचे सांगितले. शैक्षणिक ज्ञानाबरोबरच कला व क्रीडा यामध्ये विद्यार्थांनी आवडीने सहभाग घेतल्यास त्यांच्या सर्वागीण विकासास निश्चितच मदत होईल असे मत डॉ. शिवाजीपाटील यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच आंतर विद्यापीठ व आंतरमहविद्यालयीन स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. श्री. नागेश पाटील यांचे हस्ते याप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले.
डॉ. ज्योती वाळके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.विद्यार्थी परिषद कार्याध्यक्ष कुमारी श्रुती देसाई हिने अहवालवाचन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणेसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कु. संचिता भोसले व कुमारी ऐश्वर्या वाबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलेतर डॉ. अर्चना ताठे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापक-कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
