गिरिस्थान प्रशालेत वसतिगृहास शिवसेनेचा विरोध; जनआंदोलनाचा इशारा
महाबळेश्वर: गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, महाबळेश्वर यांच्या नवीन आणि सध्या वापरात असलेल्या इमारतींमध्ये मुला-मुलींचे वसतिगृह सुरू करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना शहर शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. या संदर्भात शहर शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मा.जिल्हा प्रमुख श्री राजेश बंडा कुंभारदरे, प्रविण नाना कदम,शहर प्रमुख राजाभाऊ गुजर, विभाग प्रमुख शंकर ढेबे, शहनवाजभाई खारखंडे आणि समीरभाई तांबोळी यांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले. गिरिस्थान प्रशालेच्या दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या नवीन इमारतीत आणि जुन्या इमारतीत मुला-मुलींचे वसतिगृह सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती शिवसेनेला मिळाली आहे. मात्र, शिवसेनेच्या मते, शैक्षणिक खोल्यांच्या अगदी लगतच वसतिगृह सुरू करणे हे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि शैक्षणिक वातावरणाच्या दृष्टीनेही योग्य नाही.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या वापरात असलेल्या कोणत्याही शालेय किंवा महाविद्यालयीन इमारतीचा वसतिगृहासाठी वापर करू नये. वसतिगृहाची आवश्यकता असल्यास ते शाळा आणि महाविद्यालयापासून किमान ५०० मीटर अंतरावर असावे. यामुळे दोन्ही घटकांना एकमेकांचा त्रास होणार नाही. अनेक शिक्षण संस्थांमध्ये वसतिगृहाची इमारत शाळा-महाविद्यालयांपासून दूर अंतरावर असते, त्यामुळे गिरिस्थान प्रशालेसाठी असा निर्णय घेणे अयोग्य असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
नगरपालिकेकडे वसतिगृहाची नवीन इमारत बांधण्यासाठी अनेक पर्यायी जागा उपलब्ध असून, त्यांचा विचार व्हावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी शिवसेनेने केली असून, अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.या गंभीर विषयावर सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य निर्णय घेण्याची विनंती शहर शिवसेनेने प्रशासनाकडे केली आहे.




