भारीच…
ज्यांनी मला घडवलं त्यांच्यासाठी…
वडिलांच्या वाढदिवसी मुलाने भेट दिली आई- वडिलांना कार
भुईंज: पत्रकार महेंद्रआबा जाधवराव
आई-वडिल आपल्या मुलांना शिकवण्यासाठी कष्ट करत असतात. दिवसरात्र राबून पैशाची जमवाजमव करुन मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात. त्याच जोरावर मुलं यशस्वी होतात. पण आपल्या वडीलांच्या कष्टाचे चीज काहीजणच करतात. (तर काहीजण मद्यधुंद अवस्थेत ‘पोर्शे’ कार भरधाव वेगाने चालवत निष्पाप लोकांचे बळी घेतात) ज्या घरातल्या मुलांना परिस्थितीची व आई वडिलांच्या कष्टाची जाणीव, त्यांनी दिलेले संस्कार सतत डोळ्यासमोर असतात ती मुले काही तरी वेगळं अद्भुत करून दाखवतात. अशाच एका सुसंस्कारीत मुलाने आपल्या वडिलांना त्यांच्या वाढदिनी महागडी चारचाकी गाडी गिफ्ट दिली आहे.
मुलगा असावा तर असा..
अजिंक्यतारा उद्योग समूहातील अजिंक्यतारा सह. साखर कारखान्यातील संगणक विभागात कार्यरत असलेले श्री. नितीन भोसले व एक उत्तम गृहिणी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रुपालीताई यांनी आपली दोन्ही मुले विरेन आणि चैत्राली यांना संस्काराचे धडे देतच उच्चशिक्षित केले. चिरंजीव विरेन हा टाटा मोटर्स मध्ये तर कु. चैत्राली आय टी क्षेत्रात नोकरीस आहेत.
१ जुलै नितीन भोसले यांचा वाढदिवस. याच दिवशी विरेनने टाटा नेक्सॉन ही महागाडी कार आपल्या मम्मी-पप्पा यांना भेट दिली. आई तुळजाभवानी मंदिरात आईसाहेबांच्या चरणी नतमस्तक झालेल्या भोसले कुटूंबातील सर्वांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वहात होता तर चिरंजीव वीरेन यांच्या अनोख्या भेटीने आनंदाश्रुत भिजलेल्या नितीन भोसले यांची छाती अभिमानाने फुलली होती.
श्री तुळजाभवानी मंदिराचे राजू पुजारी यांच्या उपस्थितीत आदरणीय सुरेशदादा साबळे यांच्या हस्ते विधिवात पूजन करण्यात आले. यावेळी कामगार युनियनचे संतोष शिंगटे, शेती विभागाचे आर.टी. पडवळ, ए. के. पडवळ, संगणक विभागाचे महेश हुमाने आणि भोसले परिवार व मान्यवर उपस्थित होते.
