गौरव खन्ना ठरला बिग बॉस 19 चा विजेता फरहाना भट्ट उपविजेती
मुंबई -ऑगस्ट महिन्यात सुरू झालेला ‘बिग बॉस’चा एकोणिसावा सिझन अखेर संपुष्टात आला आहे. 7 डिसेंबर 2025 रोजी पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये विजेत्याची घोषणा करण्यात आली. या स्पर्धकाने इतर चौघांना मात देत बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली आहे.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्ना याने ‘बिग बॉस 19’चं विजेतेपद पटकावलं आहे. ऑगस्ट महिन्यात बिग बॉसचा एकोणिसावा सिझन सुरू झाला होता. त्याची सांगता आज (7 डिसेंबर 2025) झाली. यंदाच्या सिझनमध्ये 16 स्पर्धक आणि दोन वाइल्ड कार्ड एण्ट्री मिळूण एकूण 18 जण सहभागी होते. त्यापैकी ग्रँड फिनालेमध्ये गौरव खन्ना, फरहाना भट्ट, प्रणित मोरे, अमाल मलिक आणि तान्या मित्तल हे पाच जण पोहोचले. ग्रँड फिनालेच्या एपिसोडमध्ये अमाल मलिक पाचव्या आणि तान्या मित्तल चौथ्या स्थानावर घराबाहेर पडले. टॉप 3 मध्ये अंतिम चुरस रंगली असताना मराठमोळ्या प्रणित मोरेचा बिग बॉसमधील प्रवास संपला. त्यानंतर फरहाना भट्टला मात देत गौरवने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली आहे.विजेता ठरलेल्या गौरव खन्नाला 50 लाख रुपये बक्षीस आणि बिग बॉसची ट्रॉफी देण्यात आली आहे.




