सातारा जिल्ह्यातील गडकोटांचे मास्टरपीस: ‘सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांची दुर्गजिज्ञासा’
माझे नावडी गावाचे परममित्र श्री.प्रदीप पाटील यांचा ‘सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांची दुर्गजिज्ञासा’ हा ग्रंथ कधी येणार याची खूप दिवस प्रतीक्षा होती. खूप दिवसांची ही प्रतीक्षा अखेरीस संपली आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पाटणचे आमदार मा.श्री. शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत या ग्रंथाचा ऐतिहासिक प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
त्यानंतर हा ग्रंथ हातात आल्यानंतर अधाशीपणे मी वाचून काढला. सातारा जिल्ह्यातील 24 किल्ल्यांचा इतिहास, नकाशे आणि विविध स्थापत्यांची रेखाटने असणारे हे मास्टरपीस मांडण्यासाठी त्यांना तब्बल नऊ वर्षांचा कालावधी लागला. त्यावरून आणि ग्रंथ वाचून काढल्यावर गडकिल्ल्यांच्यावर ग्रंथ कसा असावा, याचा एक आदर्शच त्यांनी घालून दिलेला आहे असे माझे प्रामाणिक मत झाले. सातारा जिल्ह्यातील हे गडकोट उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतूत कसे पहायचे हेही आपल्याला या ग्रंथावरून समजेल.
सातारा जिल्ह्यातील किल्ल्यावर अनेक ग्रंथ आज उपलब्ध असले तरी या सर्व २६किल्ल्यांची अत्यंत तपशीलवार, विस्तृत आणि ओघवत्या शैलीत मांडणी करणारा हा अत्यंत परिपूर्ण ग्रंथ आहे. या ग्रंथात सातारा जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती सांगितलेली आहेच याशिवाय या जिल्ह्याचा अश्मकालीन कालखंडापर्यंत मागे जाणारा इतिहासही रेखाटलेला आहे. हा ग्रंथ वाचताना आपल्याला प्रत्यक्ष गडाकिल्ल्यावर फिरल्याचा भास होतो कारण या किल्ल्यांचा इतिहास, स्थलदर्शन, गडावरील इमारतींच्या तसेच अवषेशांच्या प्रमाणबद्ध आकृत्या आणि गडाचा संपूर्ण नकाशा आपल्याबरोबर आहे असे ग्रंथ वाचताना जाणवते. या ग्रंथातील आकर्षक फोटो आपल्यासमोर जिवंत गड समर्थपणे उभा करतात.
या ग्रंथातील प्रत्येक वाक्याला संदर्भाची दिलेली उत्तम जोड़ आणि मराठ्यांच्या चौथ्या राजधानीवर म्हणजेच सातारा जिल्ह्यातील किल्ल्यावर असे इत्यंभूत संदर्भ देणारा हा एकमेव ग्रंथ याचा आम्हा सातारावासियांना सार्थ अभिमान आहे. हा ग्रंथ लिहिताना श्री प्रदीप पाटील यांनी अभ्यासलेल्या दुर्मिळ ग्रंथाचा संदर्भ, बखरी, भाषांतरित पत्रे, शिलालेख यांच्यामधून पंचवीस किल्ल्यांचा लेखाजोखा अतिशय समर्पकपणे आणि अभ्यासपूर्ण मांडलेला आहे.
या सर्वातील महत्वाची बाब म्हणजे लेखक श्री. प्रदीप पाटील हे व्यवस्थापनाचे विद्यार्थी असूनही त्यांनी वास्तू रेखाटनाचे शिवधनुष्य लिलया पेललेले आहे. स्वत: पुढाकार घेऊन सूक्ष्म रेखाटने कशी करायची याबाबतचे ज्ञान आत्मसात करून त्यांनी पंचवीस किल्ल्यांची तंगडतोड करून हा इतिहास आपल्यापुढे आणलेला आहे. इतिहासातील समकालीन ग्रंथाबरोबरच वि.का.राजवाडे, वा.सी. बेंद्रे, सेतु माधवराव पगडी, प्रा.जयसिंगराव पवार, श्री.पांडुरंग पिसुर्लेकर, श्री.गजानन मेहेंदळे, श्री.अ.रा.कुलकर्णी, खरे यांच्यासारख्या इतिहासतपस्वी लोकांच्या संशोधन ग्रंथाच्या संदर्भाने आणि प्रदीप सरांच्या अभ्यासाने हा ग्रंथ तेजाने उजळून निघालेला आहे.
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडकोटांची अवस्था आज बिकट असली तरी सातारा जिल्ह्यातील पंचवीस गडकिल्ल्या बरोबर त्या त्या गडासाठी संवर्धन कार्य करणारी एकतरी दुर्गसंस्था आहे हि गोष्ट आज समाधान देणारी आहे. आजची तरुणाई याकडे सकारात्मक दृष्टीने पाहते आहे. त्यांना या ग्रंथाच्या मदतीने योग्य संवर्धन पद्धतीची माहिती या ग्रंथाच्या मदतीने होऊन मार्गदर्शन होईल. अशा या मोबाईल युगात दुर्गजिज्ञासा हा ग्रंथ आजच्या तरुणाईसाठी मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.
या पुस्तकास पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील पुरातत्व विभागाचे संशोधक तसेच सुप्रसिद्ध दुर्गअभ्यासक डॉ. सचिन जोशी यांची सुंदर प्रस्तावना लाभलेली आहे. त्याचबरोबर मनोगत व्यक्त करताना प्रदीप सरांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि अतीव परिश्रमाचा गेल्या नऊ वर्षांचा संसार मांडलेला आहे. त्यांचे यासाठी मनापासून कौतुक आहेच. त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत दुर्गजिज्ञासा टीमचेही आभार मानायला हवेत. या सर्वांची मेहनत मी स्वत: त्यांच्याबरोबर वासोटा किल्ला करताना आणि तेथील रेखाटने घेताना पाहिलेली आहे. त्यांच्याबरोबर ‘याची देहा याची डोळा’ मी त्यावेळी होतो हे मी आज अभिमानाने सांगू शकतोय.
‘सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांची दुर्गजिज्ञासा’ या ग्रंथाचे मुखपृष्ठ कोल्हापूरच्या श्री.गजानन जोशी यांनी अतिशय सुबक आणि अप्रतिम तयार केलेले आहे. पार्श्व पब्लिकेशन, कोल्हापूर यांनी अतिशय ‘फुरसतसे’ या ग्रंथाला बनवून वाचकांच्या भेटीला उपलब्ध करून दिलेले आहे. या ग्रंथाची मांडणी हार्ड बाउंड असून ४४४ पानांचा हा ग्रंथ कृष्णधवल आणि रंगीत पृष्ठानी सजविलेला आहे. ग्रंथाच्या पानांची गुणवत्ता लेखकाच्या अभ्यासासारखीच उच्च प्रतीची आहे.
एक परममित्र म्हणून श्री प्रदीप पाटील सरांचा मला अभिमान आहेच या बरोबर सातारा जिल्ह्यातील गडकोट याबद्दल आदर असणाऱ्या प्रत्येकासाठी हा ग्रंथ म्हणजे एक ऐतिहासिक दस्ताऐवजाची मेजवानीच आहे. सातारा तसेच सह्याद्रीतल्या प्रत्येक विद्यार्थी, दुर्ग अभ्यासक, गडभटके, संशोधक, पर्यटक, इतिहासप्रेमी वाचक या ‘सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांची दुर्गजिज्ञासा’ ग्रंथाचे स्वागत नक्कीच करतील.
सहा.प्रा.सुर्यकांत शामराव अदाटे
प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय,
देऊर
९९७५७५९३२५