भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला मुंबईत केवळ ५२ जागांचा प्रस्ताव? जागावाटपावरून महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता
मुंबई-राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची घोषणा केली असून मुंबईतही एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्रित निवडणूक लढणार आहे. मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महौपार होईल, महायुतीचाच भगवा फडकेल असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची मुंबईतील
जागावाटपासंदर्भात बैठक पार पडली. यात मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून शिवसेनेला केवळ ५२ जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी निवडणूक होत असून महायुतीत भाजप आणि शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे, दोन्ही पक्षाकडून जागावाटपासंदर्भात आज पहिली बैठक पार पडली. या बैठकीत भाजपने शिवसेनेला केवळ 52 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे शिवसेनेकडून आपणास 125 जागा मिळाव्या यासाठी आग्रह आहे. भाजपकडून थेट आकडेवारी सांगत वार्डातील जागांची यादीच समोर ठेवण्यात आली. त्यानुसार, एकनाश शिंदेंच्या शिवसेनेची ताकद असलेल्या 52 जागा शिवसेनेला सोडण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत 2017 सालचे जवळपास 47 नगरसेवक आहेत. भाजप आणि शिवसेनेत परवा वॉर्डनिहाय चर्चा होणार असून ज्याद्वारे जागावाटप अंतिम होणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंही कंबर कसली असून एकनाथ शिंदे स्वत: शिवसेनेसाठी मुंबईच्या 227 वॉर्डमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. गुरुवारपासून या मुलाखतींना सुरुवात होणार असल्याची माहिती असून मुंबईमधील सर्व विभागांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठीच्या अर्जाचं वाटपही सुरू करण्यात आलं आहे. भाजपकडून केवळ 52 जागांचा प्रस्ताव शिवसेनेला देण्यात आला असतानाही, शिवसेनेकडून संपूर्ण 227 जागांसाठी मुलाखती घेण्याची तयारी सुरू केल्याने महायुतीतील जागावाटप नेमकं कसं होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत यासंदर्भाने निर्णय घेणे अपेक्षित आहे. कारण, 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी निकाल जाहीर होणार आहे.




