प्लास्टिकमुक्त महाबळेश्वरसाठी वन विभागाचा पुढाकार
महाबळेश्वर प्रतिनिधी -५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सातारा वन विभागाच्या वतीने महाबळेश्वर येथे “प्लास्टिक मुक्त महाबळेश्वर” अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत वृक्षारोपण तसेच विविध ठिकाणी प्लास्टिक कचरा संकलन मोहीम आयोजित करण्यात आली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ सकाळी ११ वाजता छत्रपती प्रतापसिंह वनउद्यान तसेच वेण्णालेक परिसर येथे होणार आहे. कार्यक्रमास उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून प्रदीप रौंदळ सह वनसंरक्षक सातारा, तहसीलदार सचिन मस्के , मुख्याधिकारी योगेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते, गटविकास अधिकारी विजय विभुते, पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच हिरडा वन विश्रामगृह येथे वृक्षारोपण व विल्सन पॉईंट परिसरात प्लास्टिक कचरा संकलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात हॉटेल असोसिएशन, पत्रकार संघ, संयुक्त वन व्यवस्थापन समिती, विविध सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत.
महाबळेश्वरसारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पर्यटनस्थळाला प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानामुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार असल्याचा विश्वास सुनील लांडगे वन परिमंडळ अधिकारी महाबळेश्वर यांनी व्यक्त केला आहे.
नागरिकांनी स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाच्या या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.





