वार्षिक कला प्रदर्शन उद्घाटन समारंभ
सातारा -गौरीशंकर एज्युकेशन सोसायटी संचलित कला महाविद्यालयाचे वार्षिक कला प्रदर्शन दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांचे सहकार्याने दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे २०, २१ व २२ मार्च रोजी कलारम्य वातावरणात उत्साहात पार पडले. या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे येथील कमर्शियल आर्टीस्ट-फोटोग्राफर,लेखक-कवी मा. श्री कौस्तुभ गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मा. श्री शिरीष चिटणीस , मा. स्वरदा चिटणीस-कुळकर्णी,मा. प्रा. विजयकुमार धुमाळ,मा.प्रसाद चव्हाण यांची सन्माननीय उपस्थिती लाभली.
कला महाविद्यालयाच्या वार्षिक कला प्रदर्शनात मान्यवर मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.कौस्तुभ गोगटे यांनी कला ही केवळ सादरीकरण नसून ती विचार आणि भावनांची प्रभावी अभिव्यक्ती असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी नेहमी नवीन कल्पना आत्मसात करून प्रयोगशीलतेवर भर द्यावा, असे त्यांनी नमूद केले.
शिरीष चिटणीस यांनी प्रदर्शन हे विद्यार्थ्यांसाठी स्वतःची कला सादर करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक कलाकृतीत मेहनत, बारकाई आणि आत्मविश्वास दिसून येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
धुमाळ सर यांनी कला क्षेत्रात यश मिळवण्यासाठी शिस्त, सातत्य आणि पारंपरिक व आधुनिक शैलींचा समतोल राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. स्वतःची शैली निर्माण कशी होईल हे पाहण्यापेक्षा आपल्या मनातील भावना आपण कॅनवास वर कशाप्रकारे एक्सप्रेस करू यावर आधी भर दिला पाहिजे त्यातून हळूहळू आपली ओळख निर्माण होते असे त्यांनी मार्गदर्शन केले.
स्वरदा चिटणीस-कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या कल्पनांना मुक्तपणे व्यक्त करण्याचे आवाहन केले. कला ही व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाची असून, प्रत्येकाने आपल्या कामात सर्जनशीलता आणि आत्मविश्वास दाखवावा, असे त्यांनी सांगितले.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या विविध कलाकृती व पेंटिंग्स मांडण्यात आल्या होत्या. अनेक चित्रांमध्ये जिवंतपणा जाणवत होता. एटीडी द्वितीय वर्षातील सुनिता कांजिले हिचे लाईव्ह हेड स्टडी चे काम सर्वांनाच खूप आवडले. तसेच निखिल जाधव याने एमडीएफ बोर्डवर साकारलेले गौतम बुद्धांचे म्युरल आणि कुणाल माने याचे स्टील लाईफ चित्र, त्यातील प्रकाश-छायांचा अप्रतिम खेळ यामुळे कला रसिकांचे लक्ष वेधले.
दिनांक २१ मार्च रोजी मा. अजय लोहार सर यांनी निसर्गचित्राचे प्रात्यक्षिक सादर केले. अल्पावधीत त्यांनी साकारलेले सुंदर चित्र उपस्थितांना भावले. त्यानंतर २२ मार्च रोजी मा. सत्यजित वरेकर सर यांनी व्यक्तिचित्रणाचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यांची उत्कृष्ट कला विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता आली. या दोन्ही चित्रकारांशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.
कला महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी ऋतुजा लोहार या वार्षिक कला प्रदर्शनात सहभागी होत्या. त्या म्हणाल्या,माझ्यासाठी हा सहभागाचा अत्यंत आनंददायी आणि प्रेरणादायी अनुभव होता. माजी विद्यार्थी म्हणून पुन्हा या व्यासपीठावर माझी पेंटिंग्स आणि क्ले ज्वेलरी सादर करताना एक वेगळाच आनंद वाटला.या प्रदर्शनातून माझ्या कलाकृतींना प्रेक्षकांकडून मिळालेलं कौतुक आणि प्रतिसाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. अशा प्रदर्शनांमुळे कलाकारांना स्वतःची कला लोकांसमोर मांडण्याची संधी मिळते आणि त्यातून आत्मविश्वास तसेच ओळख वाढते.कला प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता कांजिले हिने केले.




