जन्नी माता मंदिरातील चोरीप्रकरणी आरोपीला ९ महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा
महाबळेश्वर प्रतिनिधी -महाबळेश्वर शहरातील जन्नी माता मंदिरातील दानपेटी फोडून चोरी केल्याप्रकरणी आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवत नऊ महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 110/2020 (कोर्ट केस क्रमांक RCC 02/2021) अन्वये भारतीय दंड संहिता कलम 457 व 380 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत अनिल मारुती लोहार (रा. महाबळेश्वर, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, ७ डिसेंबर २०२० रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी विठ्ठल कोंडीबा शेलार (वय ३४, रा. कोट्रोशी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) याने महाबळेश्वर हद्दीतील जन्नी माता मंदिराचे दरवाजाचे कुलूप व कडी फरशीच्या तुकड्याच्या साहाय्याने तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर दानपेटीचे कुलूप तोडून त्यामधील १५० रुपयांची रोकड चोरी केली होती. या प्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मा. उदय इवरे, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, महाबळेश्वर यांनी आरोपीला भारतीय दंड संहिता कलम 457 व 380 अंतर्गत दोषी ठरवून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 248(2) अन्वये नऊ महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार पी. आर. जाधव यांनी केला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस कॉन्स्टेबल कुंभार (PC 2468) व पोलीस कॉन्स्टेबल कुंभार (PC 2420) यांनी पैरवी केली. या खटल्यात सरकारी वकील डी. एम. शेख यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
या प्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल साळुंखे (वाई विभाग) तसेच पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे (महाबळेश्वर पोलीस ठाणे) यांनी विशेष मार्गदर्शन केले. खटल्यात एकूण चार साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.
दरम्यान, संबंधित आरोपीचे फिंगरप्रिंट व एमसीयूची नोंद ठेवण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.





