किसन वीरांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य-प्रमोद शिंदे; किसन वीर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
सातारा -थोर स्वातंत्र्यसैनिक देशभक्त किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांनी समाजासाठी सामाजिक, सहकार व शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून खुप मोठी उल्लेखनीय कामे केलेली आहेत. किसन वीर कारखाना, जनता शिक्षण संस्था व सातारा जिल्हा बँकेची स्थापना करून सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण केले असल्याचे गौरवोदगार किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी काढले.
किसन वीर यांच्या ४६ व्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या अभिवादन समारंभात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री व कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील यांनी कारखान्याची सुत्रे हातात घेतल्यापासून किसन वीर यांना अभिप्रेत असलेले काम कारखान्यावर सुरू केलेले असून आर्थिक गर्तेत रूतलेला सहकारातील हा कारखाना बाहेर काढण्याचे काम केलेले आहे. किसन वीर व खंडाळा कारखान्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्याच्या मार्गाने दोन्हीं कारखाने मार्गक्रमण करीत असून शेतकरी व कामगारांच्या सहकार्य व पाठींब्यामुळेच हे शक्य होणार आहे. मागील तीन गळित हंगामात शेतकरी वर्गाने ज्या पद्धतीने सहकार्य केलेले आहे, असेच सहकार्य यावर्षीदेखील करीत असल्याचे चित्र दोन्ही कारखान्याचे गाळप पुर्ण क्षमतेने होत असल्याने ते दिसून येत आहे. कारखान्याचे को-जन व डिस्टीलरी प्रकल्पही पुर्ण क्षमतेने सुरू आहेत. शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपल्या संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्याला गळितासाठी घालण्याचे आवाहनदेखील व्यवस्थापनाच्यावतीने केलेले आहे.
कार्यक्रमास कारखान्याचे संचालक रामदास इथापे, प्रकाश धुरगडे, संजय कांबळे कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.



