सातारा येथील दत्त कॉलनी गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम
सातारा :साताऱ्यातील अहिरे कॉलनी येते श्री दत्त कॉलनी गणेश मंडळ आहे. त्याचे व्यवस्थापन यावर्षी एक शिक्षक दांपत्य स्वाती आणि गणेश माने यांच्याकडे आले. त्यांनी ठरवले, की तसेही आपले मंडळ अनावश्यक डामडौल, ध्वनीप्रदूषण या गोष्टी टाळत गणेशोत्सव साजरा करते दरवर्षी. पण यावर्षी त्यापुढचे एक पाऊल टाकूया आणि काहीतरी भरीव, प्रबोधनात्मक असं आपल्या सदस्यांना देण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी गणेशोत्सवाचे 11 दिवस वेगवेगळ्या विषयावरील तज्ज्ञ लोकांना बोलावून त्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देऊया आणि महत्वाचे म्हणजे कार्यकारनीं मंडळाने याला अनुमोदन दिले.
या स्तुत्य उपक्रमाचा श्रीगणेशा करण्याची विनंती त्यांनी डॉ. अदिती काळमेख यांना केली आणि त्यांनी ती आनंदाने स्वीकारली. सायंकाळी आरती वगैरे आवरून आबालवृद्ध सर्व मंडळी उत्सुकतेने बसलेली होती.आरोग्य आणि पालकत्व हे डॉ. काळमेख यांचे जिव्हाळ्याचे विषय. त्या विषयावर सर्वांशी पाऊण तास त्यांनी मनमोकळा संवाद साधला. कार्यक्रम संपल्यानंतर “कितीतरी नवीन गोष्टी समजल्या मॅडम “,”या गोष्टींचा कधी विचारच केला नव्हता हो “, अशा प्रतिक्रिया जेव्हा लोकांनी दिल्या, तेव्हा आपल्या तळमळीचे सार्थक झाल्यासारखे माने दांपत्याला वाटले.या उपक्रमाबद्दल बोलताना हे दांपत्य म्हणाले,”उपस्थित लोकांपैकी 2-4 जरी लोकांनी यातून काही घेतले, आपल्यात बदल केले, तरी आमची धडपड सार्थकी लागेल “
आज पोक्सो कायदा, उद्या करिअर गाईडन्स अशी रोज वेगवेगळी वैचारिक मेजवानी उपलब्ध करून देणाऱ्या या गणेश मंडळाचा इतर सर्व मंडळांनी नक्कीच आदर्श घ्यायला हवा. या अभिनव उपक्रमाची संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये चर्चा आहे.
