गूगल मॅपच्या दिशानिर्देशामुळे पर्यटकांची इनोव्हा दरीत; गोडवली-दांडेघर रस्त्यावरील धोकादायक वळण पुन्हा चर्चेत
पाचगणी (प्रवीण घाडगे): पाचगणी परिसरात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची इनोव्हा कार गोडवली-दांडेघर रस्त्यावरील मोठ्या वळणावरून खाली घसरल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित वाहनचालक गूगल मॅपच्या दिशानिर्देशानुसार जात असताना धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने वाहन रस्त्याखाली गेले. या ठिकाणी यापूर्वीही अशा स्वरूपाचे अनेक अपघात घडले असून, रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करणे आवश्यक असल्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
तसेच या वळणावर संरक्षण कठडे, इशारा फलक, परावर्तित चिन्हे आणि पुरेशा प्रकाशयोजनेची व्यवस्था करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





