कर्तुत्व व जनाधार असल्याने आ.श्रीमंत छ. शिवेद्रसिंहराजेंना मंत्रिपद निश्चित मिळेल – आमदार योगेश टिळेकर
भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )-हिंदू बहुजन सन्मान यात्रा महाराष्ट्र दौऱ्यात पहिल्या टप्यातील नायगाव ते चौण्डी यामध्ये कुडाळ ता. जावली येथे आयोजित कार्यक्रमात आमदार टिळेकर बोलत होते . यावेळी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, भाजपाचे निवडणूक संघटक अविनाश कदम, जावली शेतिउत्पन्न बाजार समितीचे सभापती जयंदीप शिंदे, सरपंच सुरेखा कुंभार, कुडाळ सोसायटीचे चेअरमन मालोजीराव शिंदे, माजी उपसभापती रवींद्र परामणे कारखान्याचे संचालक परामणे, कारखान्याचे संचालक राजेंद्र फरांदे, प्रदीप तरडे, भाजपा शहर अध्यक्ष विकास गोसावी, संभाजी इंदलकर उपस्थित होते.
आ.योगेश टिळेकर म्हणाले,या यात्रेच्या माध्यमातून समाजा पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. महायुती सरकारने ओबीसी व बहुजन समाजासाठी केलेली कामे समाजा पर्यंत पोहचवण्याची जबाबदारी पक्ष नेतृत्वाने आपल्याकडे सोपवले आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्रफडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. परंतु विरोधक सत्तेत असताना त्यांना सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकवता आले नाही. बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी ओबीसी मंत्रालय सुरु केले. भारतीय जनता पक्ष जातीवादी पक्ष असल्याचा खोटा नरेटिव्ह विरोधक पसरवत आहेत परंतु भारतीय जनता पक्ष जातीय वादी केव्हाच नव्हता व नाही. राष्ट्रभक्त असणाऱ्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचेच पक्षाचे ध्येय आहे. म्हणूनच अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले. आताच्या महायुती सरकारने विविध जाती जमाती साठी महामंडळाची स्थापना केली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने प्रयत्न केला. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे यांना प्रचंड मतांनी निवडून देऊन महायुतीची सत्ता बहुमताने राज्यात आणण्याचे काम सर्वांनी करावे असे आवाहन आमदार टिळेकर यांनी यावेळी केले.
प्रारंभी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्या हस्ते आमदार टिळेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सौरभ शिंदे म्हणाले, आमदार टिळेकर यांनी आपल्या स्वकर्तुत्वाने राजकारणात यश मिळवले आहे त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटचे विश्वासू सहकारी म्हणून आमदार टिळेकर यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांनी आमचे लोकप्रिय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना पुढील सरकारमध्ये मंत्रीपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जावली तालुका भाजपा अध्यक्ष श्रीहरी गोळे यांनी केले. जावली महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे यांनी आभार मानले.
