दमदार पावसामुळे कोयना धरण ७५ टक्के भरले; पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ
कोयनानगर, दि. २८ : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे मोठी वाढ झाली आहे. यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झाल्याने सुरुवातीच्या काळात कोयना धरणातील पाणीपातळी लक्षणीयरीत्या कमी झाली होती. मात्र, जुलै महिन्यात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वेगाने वाढ झाली असून धरण सुमारे ७५ टक्के भरले आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास आगामी काळात धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात कोयना धरण पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने भरण्याच्या आशा बळावल्या आहेत.





