आसमानी संकटात सापडलेल्या धनगर कुटुंबीयांच्या मदतीला डॉक्टर आले धावून
वाई प्रतिनिधी :बुधवार दिनांक 5 जून रोजी वाई व परिसर दुपारी विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने झोडपून काढला .यावेळी पसरणी येथे वीज पडुन ३८ बकरी मरण पावली तर नंतर आलेल्या पावसाच्या पुरात अनेक लहान कोकरे व बकरी वाहून गाळात रुतून मरण पावली. यात जगन्नाथश्रीपाती कोळेकर (मूळ रा. नांदल, ता.फलटण, सध्या रा. पसरणी ) यामेंढपाळचे सुमारे दहा लाखाचे खूप मोठे असे नुकसान झाले. सुमारे एक तास मुसळधार पाऊस कोसळत होता.यावेळी जगन्नाथ श्रीपाती कोळेकर (रा. नांदल, ता. फलटण, सध्या रा. पसरणी) हे बकऱ्या चरण्यासाठी डोंगरात गेले होते. गावातील नवाब बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या वडाच्या झाडाखाली पावसापासून वाचण्यासाठी बकऱ्या जमा झाल्या होत्या. यावेळी अचानक विज पडून ही मोठी दुर्घटना झाली.
सुमारे ४० वर्षापासून कोळेकर आपल्या मेंढ्या चारण्यासाठी पसरणी येथे येत असतात त्यांच्यावर अचानक आलेल्या संकटामूळे त्यांनी अक्षरशः टाहो फोडला. पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या मेंढ्या डोळ्या देखत मृत्यू पावल्या त्यांना अश्रू अनावर झाले होते. ही बातमी प्रसार माध्यमाच्या मदतीने वाऱ्यासारखी वाई तालुक्यामध्ये पसरली.
घटनेची तीव्रता लक्षात आल्यानंतर वाई शहरातील प्रतिष्ठित पाटील हॉस्पिटल चे सर्वेसर्वा, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर अजय पाटील यांनी वाईच्या नायब तहसीलदार वैशाली जायगुडे घोरपडे यांच्याशी संपर्क करून शासना माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याची विनंती केली. त्यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर ते आपल्या हॉस्पिटल मधील स्टाफ व मित्रमंडळींच्या बरोबर तसेच पसरणी ग्रामस्थांच्या बरोबर कोळेकर कुटुंबीयांच्या भेटीसाठी पसरणी येथे दाखल झाले. दुर्घटनेची संपूर्ण माहिती घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून कोळेकर कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून रुपये 51 हजाराचा धनादेश सुपूर्त केला. त्यांच्या समवेत सचिन महांगडे अक्षय जगताप,अक्षय केंद्रे दवाखान्याच्या नर्स रजनी भोसले व चैतन्या लाखे त्याचप्रमाणे सरपंच सौ हेमलता अशोकराव गायकवाड,उपसरपंच बद्रीनाथ प्रदीप कुमार महांगडे,युवा नेते स्वप्निल भाई गायकवाड माजी उपसरपंच विशाल शिर्के ,राजेंद्र शिर्के,भगवान पाटील हरिदास कायगुडे, शिवसह्याद्री करियर अकॅडमी वाई चे राजेंद्र खरात व मोठ्या संख्येने पसरणी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. या मदतीमुळे आपत्तीग्रस्त धनगर कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले.