महाबळेश्वरच्या मधाच्या गावी ‘मांघर’मध्ये तीन नोव्हेंबर रोजी मधपेट्यांचे वाटप
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील ‘मधाचे गांव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांघर येथे सोमवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी मधपाळांना सातेरी मधपेट्यांचे वाटप आणि नामफलक अनावरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
उद्योग समूहाच्या सामाजिक दायित्व निधीतून वाटप:
देशातील पहिले ‘मधाचे गाव’ म्हणून ओळख असलेल्या मांघर येथील मधपाळांसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आरती ड्रग्स, प्रा. लि. बोईसर, मुंबई आणि स्किलनेट सोल्यूशन्स इंडिया प्रा. लि. मुंबई या कंपन्यांच्या व्यावसायिक सामाजिक दायित्व निधीतून (CSR) या सातेरी मधपेट्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या वाटपामुळे मांघर येथील मधपाळांना अधिक शास्त्रीय पद्धतीने मधमाशी पालन करणे शक्य होणार असून त्यांच्या व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:
या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात प्रामुख्याने रविंद्र साठे (सभापती, राज्यमंत्री दर्जा, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई), गीतांजली बाविस्कर (भा.प्र.से., मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई), रविंद्र ठाकरे (सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई), नित्यानंद पाटील (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई), प्रकाश पाटील (अध्यक्ष, आरती ड्रग्स प्रा. लि. बोईसर, मुंबई), विवेक दामले (अध्यक्ष, स्किलनेट सोल्यूशन्स इंडिया प्रा. लि. मुंबई), रघुनाथ नारायणकर (प्र. संचालक, मधसंचालनालय महाबळेश्वर), निसार तांबोळी (प्र. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, सातारा), गणेश जाधव (सरपंच, मांघर गाव) आणि महादेव (नाना) जाधव (मा. व्यवस्थापक, मधुसागर मधोत्पादक सहकारी संस्था, महाबळेश्वर) यांचा समावेश आहे.
वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन
महाबळेश्वर तालुक्यातील सर्व मधपाळांना मांघर येथे सोमवार, दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे मधपाळांना मार्गदर्शन आणि आवश्यक साधनांची उपलब्धता होणार असल्याने हा कार्यक्रम परिसरातील मध उद्योगासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.




