धनगरवाडी चे पाणी शेतात खळखळणार : आमदार मनोजदादा घोरपडे
मसूर : प्रतिनिधी हणबरवाडी-धनगरवाडी उपसा सिंचन योजना गेली अनेक वर्ष रखडलेली होती. सध्या हणबरवाडीचे काम पूर्ण झाले असून शेतकऱ्यांना त्याचे आवर्तन चालू आहे परंतु बहुप्रतिक्षित धनगरवाडी उपसा सिंचन टप्पा क्रमांक 1 चे काम पूर्ण झाले आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये टप्पा क्रमांक एकचे टेस्टिंग करून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येणार असल्याची माहिती कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली. जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीस पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई, नामदार जयकुमार गोरे, ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. मकरंदआबा पाटील, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार महेश शिंदे, आमदार अतुलबाबा भोसले, आमदार सचिन पाटील, जलसंपदा विभागाचे अधिकारी संजय बेलसरे, राहुल घनवट व इतर अधिकारी उपस्थित होते.
टप्पा क्रमांक एकचे पाणी शेतात खळाळणार असल्याने त्याचा लाभ हेळगाव, पाडळी,कचरेवाडी, गोसावीवाडी, बानुगडेवाडी इत्यादी गावांना होणार आहे.धनगरवाडी टप्पा क्रमांक एक साठी विद्युत विभागाला 80 लाख रुपये डिपॉझिट करून मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्याची टेस्टिंग करण्यात येणार आहे. तसेच टप्पा क्रमांक दोन साठी 22 कोटी निधी लवकरच उपलब्ध होणार असून टप्पा क्रमांक दोन चे काम लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेताला पाणी देणार असल्याचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सांगितले.
बैठकीतील चर्चेदरम्यान आमदार मनोजदादा घोरपडे यांनी कराड उत्तर मधील जलसंपदा विभागाशी निगडीत असलेल्या समस्या सोडवण्याबाबत आश्वासन दिले होते.त्यानुसार धनगरवाडी उपसा सिंचन योजनेचे टप्पा क्र. १ चे काम पूर्ण होऊन ४ महिने झालेले असुनही केवळ महावितरण विभागास सुधारीत भारसाठीचा निधी उपलब्ध नसलेने सदर योजना कार्यान्वित करणेस जलसंपदा विभागास अडचणी निर्माण होत होत्या. सदर निधी आमदार मनोजदादा घोरपडे मंत्रालय मुंबई येथे पाठपुरावा करुन ८०.०५ लक्ष रुपये निधी उपलब्ध करुन दिला व त्याचा भरणाही दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी महावितरण विभागास केला. त्यामुळे सदर योजनेचा टप्पा क्र. १ मार्च २०२५ च्या पहिल्या आठवड्यामध्ये कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाचे नियोजन युद्ध पातळीवर चालु आहे. त्यामुळे जवळपास २०००-२००१ सालापासुन प्रलंबित असलेली धनगरवाडी उपसा सिंचन योजना येत्या मार्चमध्ये कार्यान्वित होणार आहे. त्या आश्वासनांची तात्काळ पूर्ती करण्यात आमदार मनोजदादा घोरपडे यशस्वी ठरले आहेत.
दरम्यान धनगरवाडी उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्र. २ मधील स्थापत्य कामे पुर्णत्वास आलेली असुन विद्युत तसेच यांत्रिकी विभागाकडील कामांना वेग मिळावा याबाबत आमदार मनोजदादा घोरपडे यांनी कार्यकारी संचालक यांना सुचित केले आहे. त्या अनुषंगाने विद्युत वितरण च्या कार्यकारी संचालकांनी विद्युत व यांत्रिकी विभागास कामांना गती देणेबाबत सुचना केल्या असून सदर योजनेचा टप्पा क्र. २ जून अखेर कार्यान्वित होणार आहे.
तसेच पाल-इंदोली उपसा सिंचन योजना टप्पा क्र. २ या योजनेस तत्वतः मान्यता मिळणेबाबत आमदार घोरपडे यांचे प्रयत्न चालू असून कार्यकारी संचालक यांच्या सहकार्यातून ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर नागझरी गावातील पाझर तलावास कृष्णा प्रकल्प, टेंभू प्रकल्प किंवा उरमोडी प्रकल्पामधून पाणी तात्काळ कसे देता येईल याचा सविस्तर अभ्यास करुन अंतिम निर्णय लवकरात लवकर घेऊन नागझरी गावातील लोकांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत आमदार मनोज दादा घोरपडे प्रयत्नशील असून तशा सूचना त्यांनी कार्यकारी संचालक यांना बैठकीदरम्यान दिल्या आहेत. दरम्यान कृष्णा नदिवरील ब्रिटिशकालीन जुने कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्तीस आलेले असुन सदर बंधा-यांचा सविस्तर अभ्यास करुन त्यांचे रुपांतर बॅरेजमध्ये करण्यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांचा प्रयत्न सुरू आहे. तसेच अतित, खोडद व सासपडे गावातील लोकांना तारळी प्रकल्पामधून पाणी उपलब्ध होणेबाबतच्या आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या मागणीला कार्यकारी संचालक यांनी त्यांच्या स्तरावरील तांत्रिक मंजुरी देणेबाबत अश्वासन दिले आहे.या सर्वच कामांंबाबत आग्रही असलेल्या व अनेक कामे पूर्णत्वास नेलेल्या आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या कार्यपद्धती वर मतदारसंघातील जनता खुश असून घोरपडे यांना मतदारसंघातील जनता धन्यवाद देत आहे.
