देऊर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जरंडेश्वर डोंगरावर गोळा केले तब्बल १८ पोती प्लास्टिक
सातारा -शिक्षक हे आपल्या शिकवणुकीतून फक्त आदर्श विद्यार्थीच घडवत नाहीत तर प्रबोधनाच्या आणि प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून सक्षम समाजनिर्मिती करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडतात. समाजनिर्मितीची ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या कृतीतून श्री क्षेत्र जरंडेश्वर मंदिर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व समान संधी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावणातील पहिल्या बुधवारी जरंडेश्वर डोंगरावर प्लॅस्टिक निर्मूलन मोहिमेचे आणि स्वच्छता उपक्रम राबवून प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालयाच्या पर्यावरण संवर्धक डॉ. कमलसिंग क्षत्रिय आणि प्रा.सुर्यकांत अदाटे या प्राध्यापकांनी यांनी आपल्या प्रेरणादायक कृतीने समाजापुढे एक आदर्श ठेवलेला आहे. यावेळी महाविद्यालयाच्या ३० विद्यार्थ्यांनी तब्बल १८ पोती प्लॅस्टिक बाटल्या आणि प्लॅस्टिक रॅपरचे संकलन करण्यात आले.
श्री क्षेत्र जरंडेश्वर मारुती मंदिरात श्रावणात तसेच प्रत्येक शनिवारी भक्तगण श्री जरंडेश्वर मारुतीरायाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. येताना पाणी बॉटल आणि प्लॅस्टिक असणाऱ्या कुरकुरे तसेच खाद्यपदार्थ रॅपर आणत असतात आणि खाऊन किंवा पाणी पिऊन बॉटल तेथेच टाकत असतात. या बाटल्यांचा आणि प्लॅस्टिक रॅपर हे कुजत नसल्याने त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो तसेच ते जाळण्याचा प्रयत्न केल्यास प्रदुषण वाढते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालयाच्या ३० विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक निर्मूलनाची ही मोहीम डॉ.कमलसिंग क्षत्रिय आणि सहा.प्रा.सुर्यकांत अदाटे या पर्यावरण संवर्धक दोन प्राध्यापकांना सोबत घेऊन जवळपास तीन तास जरंडेश्वर मंदिर परिसर आणि डोंगरावर राबविली.
प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम, त्याचा पर्यावरण तसेच मानवी जीवनावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन महाविद्यालयाने जरंडेश्वर डोंगरावरील प्लॅस्टिक निर्मूलनाचे उच्चाटन करणे या उद्देशाने या प्लॅस्टिक निर्मुलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सातारा रोडमार्गे जरंडेश्वर डोंगर चढत चढाईमार्गावरील पायऱ्यांच्याजवळ पडलेले प्लॅस्टिक गोळा करत प्लॅस्टिक कचरा संकलनास सुरुवात केली. प्रथम या जरंडेश्वर मंदिर परिसरातील केरकचरा झाडूच्या माध्यमातून झाडून हा परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांचे चार गट करून पायऱ्या परिसर, मंदिराच्या मागील परिसर, गोशाळा व बारव परिसर, समर्थ रामदास गुंफा परिसर स्वच्छ करून जवळपास तीन तास प्लॅस्टिक बाटल्यांचे संकलन करण्यात आले. या ३० विद्यार्थ्यांनी या ऐतिहासिक चार ठिकाणावरून तब्बल १८ पोती प्लॅस्टिक बाटल्यांचे संकलन केले. त्यानंतर हा सर्व प्लॅस्टिक कचरा रिसायकलिंगला देण्यात आला.
पर्यावरणातील वाढता प्लॅस्टिक चा वापर पाहता आषाढ महिन्यातील शेवटच्या शनिवारीपासूनच जरंडेश्वर परिसरातील स्वच्छता ही आपली सर्वांची जबाबदारी असून आपण त्यात पुढाकार घेतला पाहिजे या भुमिकेतून डॉ. कमलसिंग क्षत्रिय व प्रा. सूर्यकांत अदाटे यांनी मंदीर परिसरातील सात पोती प्लॅस्टिक गोळा केले होते आणि पहिल्या श्रावण शनिवारी जरंडेश्वरवरील भक्तगनांना स्वच्छतेच्या विषयावर जनजागृती करत सामाजिक योगदानाची जाणीव करून दिली होती.
डॉ. कमलसिंग क्षत्रिय व प्रा. सूर्यकांत अदाटे यांनी या अगोदर सातत्याने जरंडेश्वर डोंगरावर स्वच्छता तसेच प्लॅस्टिक संकलनाचे कार्य केलेले आहे. या दोन्ही प्राध्यापकांना सामाजिक कार्याची आवड असून हे दोघेही पर्यावरणप्रेमी तसेच गडसंवर्धन कार्यात अग्रेसर असतात. स्वच्छता जागृतीसाठी त्यांनी जरंडेश्वर डोंगर केंद्रस्थानी मानून या श्री क्षेत्र जरंडेश्वर डोंगर स्वच्छता करण्याचे ध्येय ठेवलेले आहे. या ठिकाणी श्री जरंडेश्वर जीर्णोद्धार समिती आणि पाडळी येथील जेष्ठ नागरिक संघसुद्धा हिरीरीने कार्यरत असतो. त्यांचेही सहकार्य यांना लाभत असते.
‘स्वच्छता हीच सेवा’ या भावनेतून श्री क्षेत्र जरंडेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून सामाजिक परिवर्तनाचे केंद्रही होऊ शकते, याची जाणीव जनतेला झाली पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या श्रावणातील प्रत्येक शनिवारी स्वत: स्वच्छता करून कृतीतून स्वच्छतेचा आणि प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश देणार असल्याचे डॉ. कमलसिंग क्षत्रिय व प्रा. सूर्यकांत अदाटे यांनी सांगितले.
यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक वापराचे परिणाम आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रदूषण यावर जनजागृतीचे आवाहन करण्यात आले. यासाठी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.शिवाजी चवरे यांचे सहकार्य लाभले. यावेळी प्रणाली कदम हिने प्लॅस्टिक निर्मूलनाबद्दल आपले मनोगते व्यक्त केले. यानंतर या सर्व विद्यार्थ्यांनी ही प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविल्याने कोरेगाव तालुका बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अड. पुरुषोत्तम बारसवडे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.कमलसिंग क्षत्रिय, समान संधी केंद्र समन्वयक प्रा. सुर्यकांत अदाटे आणि महाविद्यालयाचे ३० विद्यार्थी, सातारा रोड पाडळी येथील जरंडेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य तसेच जय जरंडेश्वर जीर्णोद्धार समिती सदस्य उपस्थित होते. या प्लॅस्टिक निर्मूलन मोहिमेचे नेटके संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.कमलसिंग क्षत्रिय, समान संधी केंद्र समन्वयक प्रा.सुर्यकांत अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
श्रावणात श्री जरंडेश्वर दर्शनाच्या निमित्ताने येणाऱ्यांनी बरोबर आणलेले प्लॅस्टिक बाटल्या किंवा कुरकुरे पाकिटे डोंगरावर इकडे तिकडे न टाकता त्या ठिकाणी कचरा कुंड्यांची सोय केलेली आहे त्यात व्यवस्थित टाकल्यास या धार्मिक आणि पवित्र स्थळावर तसेच डोंगरावर सगळीकडे स्वच्छता राहील आणि प्लॅस्टिक प्रदूषण होणार नाही.
सहा.प्रा. सुर्यकांत अदाटे, पर्यावरणवादी प्राध्यापक
श्रावणात श्री जरंडेश्वर डोंगरावर असणाऱ्या औषधी वनस्पतींची ओळख या प्लॅस्टिक निर्मुलन जनजागृती मोहिमेमुळे विद्यार्थ्यांना झाली. देऊर महाविद्यालय अशा सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना नेहमीच प्राधान्य देत असते. डोंगरावर दर्शनाला येणाऱ्यांनी प्लॅस्टिक बद्दल सजगता बाळगायला हवी.
डॉ.कमलसिंग क्षत्रिय, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, देऊर




