साताऱ्यात ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’ उपक्रम; ४ व ५ एप्रिलला प्रदर्शन
सातारा : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून “अमृतपेठ थेट बाजारपेठ” हा उपक्रम राबविण्यात येत असून, याअंतर्गत प्रदर्शन व स्टॉल विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमातून स्वदेशी तसेच स्थानिक लघुउद्योजकांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येत असून, त्यांच्या उत्पादनांना E- कॉमर्स प्लॅटफॉर्म अमृतपेठ या अँप्लिकेशन च्या माध्यमातून आणि अमृत पेठ थेट बाजारपेठ असे मार्केट उपलब्ध करून दिली जात आहे.
सातारा येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, दिनांक ४ व ५ एप्रिल २०२६ रोजी महिला मंडळ हॉल, राजवाडा, सातारा येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन दोन दिवस सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे.
या प्रदर्शनामध्ये विविध लघुउद्योजक, बचतगट आणि स्थानिक उत्पादक सहभागी होणार असून, त्यांच्या विविध दर्जेदार उत्पादनांची थेट विक्री केली जाणार आहे. नागरिकांना स्थानिक व स्वदेशी वस्तू खरेदी करण्याची उत्तम संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.सातारा व परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




