महाबळेश्वरमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास: ‘द क्लब’ परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड आणि उत्खनन; अध्यक्षांसह तिघांवर गुन्हा दाखल
महाबळेश्वर:पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या महाबळेश्वरमध्ये निसर्गाची कत्तल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील प्रतिष्ठित ‘द क्लब’ परिसरात कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केल्याप्रकरणी, महाबळेश्वर पोलीस ठाण्यात ‘द क्लब’च्या अध्यक्षांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महाबळेश्वरमधील भूमाफिया आणि निसर्गाची हानी करणाऱ्या संस्थांचे धाबे दणाणले आहेत.
महाबळेश्वर येथील मौजे सिटी सर्व्हे नंबर ११७ व ११८ मध्ये ‘द क्लब’ची हद्द येते. मिळालेल्या माहितीनुसार, २० मे २०२५ ते ११ जून २०२६ या कालावधीत ‘द क्लब’ परिसरात विनापरवाना वृक्षतोड करण्यात आली. ही बाब पालिकेच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पाहणी केली. वृक्षतोडीचा प्रकार स्पष्ट झाल्यानंतर, महाबळेश्वर नगरपालिकेचे कर्मचारी श्री. कल्याण बाजीराव हिवरे (वय ५२) यांनी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे: श्रीमती मनीषा गोखले शाह (वय ६५): अध्यक्षा, द क्लब, महाबळेश्वर, लेफ्टनंट कर्नल गौतम नंदी (निवृत्त) (वय ६२): सेक्रेटरी, द क्लब, महाबळेश्वर, श्री. सुहास पार्टे (वय ४०): द्वारकाधीश कन्स्ट्रक्शन वर्क, मेढा, ता. जावली.
कायदेशीर कलमे:
आरोपींविरुद्ध महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन व संवर्धन अधिनियम १९७५ चे कलम २१(१)(२), ११ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३२४(४), ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक ५३/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बी. पी. सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अवघडे करत आहेत. महाबळेश्वरसारख्या इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये झालेल्या या वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.




