समर्पण नावाची गोष्ट म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी -डॉ. सुनीलकुमार लवटे
सातारा, दि. 25( प्रतिनिधी ):- माणुस किती व्यासंगी आणि किती कष्टपूर्वक एखादे काम करतो समर्पण नावाची गोष्ट म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. मला न मिळालेले अप्राप्त संदर्भ दिलेत की जेणेकरून नव्या पिढीने ते मिळवावेत आणि याचे नाव समग्र जरी असले तरी ते संदर्भ जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत हा समग्र वाङ्मय प्रकल्प पूर्ण होणार नाही, तो नव्या पिढीने करावा असे आवाहन प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.
येथील आम्ही पुस्तक प्रेमी समूह, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ( थोरले) नगर वाचनालय तसेच दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने आयोजित प्राचार्य डॉ. सुनील कुमार लवटे यांच्या त्री दिवशीय व्याख्यानमाला येथील नगर वाचनालयाच्या पाठक हॉल मध्ये संपन्न झाली. या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी समग्र वाङ्मयातून दिसणारे तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ, शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे,डॉ. संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस, डॉ. विश्वास सुतार, वि. ना. लांडगे,विनोद कुलकर्णी, श्रीराम नानल आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे पुढे म्हणाले, अत्यंत योगायोगाने तर्कतीर्थांचे संपादन माझ्या हातून झाले. तर्कतीर्थ यांनी आयुष्यामध्ये जे जे केले ती सर्व विचारपूर्वक कृती होती. माझ्या मुलाने असे शिक्षण घ्यावे की ते ज्ञानप्रसारक होईल अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. गुरुकुल ला ऍडमिशन झाले नाही म्हणून ते वाईला आले. त्यांचे सगळे शिक्षण अनौपचारिकपणे झाले. तर्कतीर्थ प्रथम संस्कृत नंतर इंग्रजी व नंतर मराठी शिकले. वेदशास्त्रातले उच्च शिक्षण घेण्यासाठी वाई सोडून ते काशीला गेले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वाई महाराष्ट्राची बौद्धिक राजधानी होती. पन्नास हजार पोथ्यांचा संग्रह वाई मध्ये आजही आहे. 1965 मध्ये त्यांनी त्यातील तेरा हजार पोथ्यांचे वर्णन केले आहे. पोथ्या तयार करणारी घराणी वाई मध्ये होती. तर्कतीर्थाने पहिल्या घटनेच्या केलेल्या प्रूफ रीडिंग ची प्रत पण आजही उपलब्ध आहे. ज्ञान संकलन व ज्ञान संपादन सातत्याने होत असते. तर्कतीर्थानी काशीला जाऊन वेदांचे संरक्षण करण्याचे शिक्षण घेतले. तर्कतीर्थाने 27 धर्मकोष इंग्रजीतून केले. तीन महिने ते गांधीजींच्या संपर्कात होते. त्याचे जीवन हे वाहते जीवन होते, ते इतके वाहत गेले की कोणत्याही विचारधारेमध्ये गुंतून गेले नाहीत. 1923 ते 1930 या कालखंडात तर्कतीर्थ शस्त्र पुरवणे, कटकारस्थान करते आदी कामे केली. धुळ्याला तुरुंगामध्ये हे सर्वांना उपनिषद शिकवायचे. भारताला समाजवादी विचार देण्यामध्ये तसेच देश बदलाच्या पाऊलखुणा तर्कतीर्थानी निर्माण केल्या.
जेव्हा जेव्हा भारत संकटात आलेला आहे तेव्हा तेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी आपल्या विचारधारेचा अवलंब करून संकटावर मात केली, असे सांगून डॉ. लवटे पुढे म्हणाले, जेव्हा जेव्हा अशिक्षित राजकारणी निर्माण होतात तेव्हा देशाचे अधपतन होते. महाराष्ट्रातले वि. स. खांडेकर व तर्कतीर्थ हे संस्कृती पुरूष होते. शिरीष चिटणीस हे सातारचे सांस्कृतिक राजदूत आहेत. तर्कतीर्थ केवळ पुस्तकी पंडित नव्हते तर राजकीय मुस्सध्दी होते. महात्मा फुले यांना जगभरात प्रसारित करणारे कोण असतील तर ते तर्कतीर्थ होते.
डॉ. विश्वास सुतार म्हणाले, लवटे सरांच्या वाङ्मयावर अभ्यास करून मी पीएचडी केलेली आहे. साने गुरुजी, वि. स. खांडेकर, तर्कतीर्थ हे तिन्ही लेखक समाज शिक्षक होते. त्यांनी 100 पेक्षा अधिक पुस्तके लिहिलेली आहेत. या लोकांनी जसे लिहिले तसेच वर्तन केले तोच वारसा लवटे सरांनी पुढे चालवला आहे. साहित्य क्षेत्रात 140 ग्रंथ सरांच्या नावावर आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विश्वास सुतार यांनी केले. सूत्रसंचालन वैदेही कुलकर्णी यांनी केले. आभार डॉ. संदीप श्रोत्री यांनी मानले.