दामले कुटुंबीयांनी अनोख्या पद्धतीने जपल्या स्मृतीहिंदवी पब्लिक स्कूलला दिली ‘लाख मोलाची’ देणगी
कलाप्रेमींचा गौरव करण्याचा मानस
सातारा, ता. ३ : वृद्धापकाळात जोडीदाराच्या निधनाने निर्माण होणारी पोकळी अत्यंत वेदनादायी असते. अनेक जण केवळ त्यांच्या आठवणीत अख्खं आयुष्य घालवतात, तर काही जण त्यांच्या आठवणी जपण्यासाठी, स्मृती चिरंतन टिकवण्यासाठी अभिनव मार्ग स्वीकारतात. संपूर्ण आयुष्य राष्ट्रीय विचारांनी जगलेले साताऱ्यातील दामले कुटुंबीय ही असंच वेगळं ठरलेत. वृद्धापकाळाने, (कै.) आशा दामले यांचा निधनानंतर दामले कुटुंब मोठ्या तणावात होते. मात्र, त्यांची आठवण जपण्यासाठी कुटुंबीयांनी हिंदवी पब्लिक स्कूलला एक लाख रुपयांची देणगी दिली आहे. त्याच्या माध्यमातून कला विषयात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थी व आदर्शपणे कार्यरत शिक्षकांचा गौरव करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
आदर्श शिक्षिका आशा दामले यांचे नुकतेच देहावसान झाले. त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात, या हेतूने पती श्री. अविनाश दामले यांनी श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांच्याकडे एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी भरत दामले, कमलाकरपंत गद्रे, शैलेश ढवळीकर आदी उपस्थित होते. दामले कुटुंबीयांकडून या देणगीद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांचे चित्रकला या कलेतील नैपुण्य पुरस्कृत करावे, तसेच दरवर्षी एक आदर्श शिक्षक पुरस्कृत करावा, असा मानस आहे. श्रीनिधी एज्युकेशन सोसायटी यास तत्त्वतः मान्यता दिली आहे.
यावेळी श्री. कुलकर्णी म्हणाले, ‘‘पत्नीच्या दुर्दैवी मृत्यूचा आघात झालेला असतानाही, एक शिक्षकच आदर्श प्रस्थापित करू शकतो. चित्रकलेसारख्या सर्जनशील कलेला उत्तेजन देण्याच्या दामले कुटुंबीयांच्या इच्छेचा सन्मान ठेवून जाहीर केलेल्या या पुरस्कारामुळे विद्यार्थ्यांचा चित्रकलेतील सहभागाचा उत्साह वाढेल, तसेच त्यांच्या कलात्मकतेला प्रोत्साहन मिळेल. आपले दुःख मनात ठेवून निरागस विद्यार्थ्यांच्या आयुष्यात उत्सव निर्माण करणारी ही कृती समाजापुढे आदर्श प्रस्थापित करणारे आहे.’’ शाळेतील कलागुणी विद्यार्थ्यी व कार्यतत प्रशिक्षक यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही देणगी अत्यंत मोलाची ठरेल, अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी श्री विजयराव पंडित, श्री मामा गोडसे, श्री महेश शिवदे, समाजातील अनेक मान्यवर तसेच दामले परिवार उपस्थित होता.