दररोजची कसरत, कधी अपघातांची भीती खड्ड्यांच्या विळख्यात वागदेव हायस्कूल–वाठार स्टेशन मार्ग
वाठार स्टेशन-वाठार स्टेशन येथील वागदेव हायस्कूल ते वाठार स्टेशन या अत्यंत वर्दळीच्या मुख्य मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हा रस्ता शाळकरी विद्यार्थी, शिक्षक, व्यापारी, रेल्वे प्रवासी तसेच ग्रामस्थांसाठी महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. परिसरात वागदेव विद्यालय व अन्य शैक्षणिक संस्था असल्याने या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.
पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रेल्वे प्रवासी प्रवास करतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून वाहनांचे नुकसानही होत आहे. अनेकदा किरकोळ अपघात घडत असूनही संबंधित विभागाकडून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित प्रशासनाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत, दर्जेदार डांबरीकरण करावे आणि नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.
वागदेव हायस्कूल ते वाठार स्टेशन हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून सध्या त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाच्या पाण्यामुळे खड्डे दिसत नसल्याने अनेक वेळा दुचाकी घसरून किरकोळ अपघात होत आहेत. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, हीच सर्वांची अपेक्षा आहे.”
सचिन जाधव,उद्योजक वाठारस्टेशन .





