सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख जपावी, बीड घटनेवर पृथ्वीराज चव्हाण आक्रमक
खंडणीखोरांना राजाश्रय देऊ नका, उच्चपदस्थांचे राजीनामे घेऊन कडक कारवाई करा पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची सखोल चौकशी होऊन देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात निघालेल्या मोर्चा दरम्यान केली. पुण्यातील या मोर्चामध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, घडलेली घटना अत्यंत निंदनीय तसेच गंभीर असून याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे, सरकारने या घटनेशी संबंधित सर्वांचे राजीनामे घेतले पाहिजेत, कोणीही उच्च पदस्थ यामध्ये असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करणे सरकारचे कर्तव्यच असल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी या आंदोलना दरम्यान व्यक्त केले. अशा घटनांमुळे राज्यामध्ये गुंतवणूकदार येण्याचे प्रमाण थांबेल. उद्योगासाठी पोषक वातावरण राज्यात असणे आवश्यक असते नाहीतर आपला महाराष्ट्र कधी मागे पडेल हे कळणार नाही. मुख्यमंत्र्यांनी या गंभीर घटनांकडे तातडीने पावले उचलली पाहिजेत अशा गोष्टीकडे लक्ष द्यावे, त्यांचे हे अपयश आहे. उच्चपदस्थांचे त्वरीत राजीनामे घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
पुण्यामध्ये सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा निषेध करण्यासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, सध्या परळीमध्ये नेमकं काय चालतं ते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच तेथील लोकप्रतिनिधींनी सांगितले आहे. दमानिया यांनी महाराष्ट्रातील अनेक गैरव्यवहार समोर आणले आहेत. त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना धमक्या येत आहेत. सामाजिक कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधी जर अन्यायाला वाचा फोडत असतील तर सरकारने राज्यातील कायदा सुव्यवस्था ची काळजी घेतली पाहिजे. एखाद्याची निघृण हत्या करणं हा मानवतेचा मुद्दा आहे. दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी घडलेल्या घटनांचे गांभीर्य बाळगून जबाबदारी स्वीकारत कडक कारवाई केली पाहिजे. या घटनांमागे जो मंत्री किंवा उच्च पदस्थ असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
घडलेली घटना कोणाच्या आदेशाने किंवा राजाश्रयाने झाली हे महाराष्ट्रातील जनतेला समजले असून याबाबत तथ्यता सरकारने समोर आणून देशमुख कुटुंबियांना न्याय दिला पाहिजे.
राज्यातील अशा घटनांमुळे जर गुंतवणूकदार आले नाहीत तर रोजगार निर्माण होणार नाहीत. खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे उत्पन्न घटत चालले आहे. देशात महाराष्ट्र अकराव्या स्थानावर आला आहे. हे सर्व भाजपचे अपयश आहे. परळी पॅटर्न जगजाहीर आहे. बीडमध्ये काय चालले ते सर्वांना माहिती आहे. राजकीय हेतूसाठी संबंधितांना वाचवले गेले तर जनता शांत बसणार नाही, असे चव्हाण म्हणाले.
मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी राज्यातील विविध शहरांमध्ये मोर्चे काढले जात आहेत. आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी घेऊन पुण्यात एक विशाल मोर्चा निघाला होता.