सीटी स्कॅनची उच्च दर्जाची प्रणाली रुग्णांसाठी फायदेशीर : डॉ. ग्रांट
अत्याधुनिक ३२ स्लाईस सीटी स्कॅनचा साताऱ्यात शुभारंभ
सातारा : गेली पाच दशके रुबी हॉल विविध माध्यमातून रुग्णांची अव्याहतपणे सेवा करत आहे. साताऱ्यात गेली १८ वर्षे रुबी हॉल रुग्णांना सुविधा देत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने रुग्णांची चिकित्सा झाल्याने त्याचे रिपोर्ट वेळेत मिळून रुग्णांवर नेमके उपचार करणे सोपे होते. उच्च प्रणाली असल्याने अचूक निदान होते. रुग्णाची वेळेची आणि पैशांची बचत होते. रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने साताऱ्यात सुरु होत असलेले सीटी स्कॅन उच्च दर्जाची प्रणालीचे असल्याने रुग्णांना फायदेशीर ठरेल, असे उद्गार डॉ. परवेझ ग्रांट यांनी काढले. अतिशय उच्च दर्जाची प्रणाली असलेल्या ३२ स्लाईस सीटी स्कॅनचा शुभारंभ झाला. त्याप्रसंगी ते बोलत हाते. कूपर कार्पोरेशनचे एमडी श्री. फरोख कूपर यांचे हस्ते आणि डॉ. सायमन ग्रांट, रुबीचे सीईओ श्री. बेहराम खुदायजी, डॉ. संदीप मुनोत, श्री. निशांत गवळी, रुबी हॉलचे असिस्टंट जनरल मॅनेजर डॉ. संजय लावंड यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. डॉ. ग्रांट पुढे म्हणाले, हे सीटी स्कॅन उच्च कोटीची प्रणालीचे असल्याने हृदयाचा सीटी स्कॅन २ ते ४ सेकंदात होतो. महाराष्ट्रातील अनेक सेंटर्सला या सुविधा सुरु आहेत.
श्री. फरोख कूपर आपल्या भाषणात म्हणाले, वीस वर्षापूर्वी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना वैद्यकीय गैरसुविधांना तोंड द्यावे लागत होते. रुबीचे सेंटर सुरु झाल्यापासून संजय लावंड याची सूत्रे सांभाळत होते. त्यांची शिस्त, सचोटी, बारकाईने केलेले नियोजन आणि अथक प्रयत्नामुळे रुबीची सेवा चांगल्या प्रकारे रुग्णांपर्यंत पोहोचली. सर्व सेंटर्सच्या बरोबरीने साताऱ्याला सुरु असलेले हृदयरोग मोफत शिबिरामुळे आजपर्यंत सहा लाखांपेक्षा जास्त रुग्णांना या शिबिराचा लाभ मिळाला आहे. ही सीटी स्कॅनची सुविधा माईलस्टोन ठरुन चांगल्या प्रकारे यश मिळवेल, असा आशावाद व्यक्त केला.
आपल्या प्रास्तविकात डॉ. संजय लावंड म्हणाले, सेवाभाव वृत्ती ठेऊन लोकांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचले पाहिजे, हाच एक उद्देश ठेऊन रुबी गेली पाच दशके रुग्णांची सेवा करत आली आहे. समाजाचे आपण काही देणे लागतो, सर्व थरातल्या लोकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाल्या पाहिजेत याच भावनेने गावोगावी रुबी एमआआय, सीटी स्कॅन सारख्या सुविधा सुरु केल्या आहेत. ही सेंटर्स रुग्णांना नवसंजीवनी ठरली आहेत. माजी सैनिकांना सवलत योजना सुरु असल्याने त्याचा लाभ अनेक सैनिकांनी घेतला आहे. समारंभास माजी सैनिक, डॉक्टर्स, वकील, रुबीच्या विविध सेंटर्सचे व्यवस्थापक, हितचिंतक उपस्थित होते.