“ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी आपण हरलो होतो, विमानं पाडण्यात आली आणि..”; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचं वादग्रस्त वक्तव्य!
पुणे :महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूर बाबत एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. मात्र या ऑपरेशन सिंदूरबाबतच पृथ्वीराज चव्हाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आपण पहिल्याच दिवशी हरलो होतो आणि आपली विमानं पाडली गेली असं आता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी १९ डिसेंबरला देशाचा पंतप्रधान बदलेल असं म्हटलं होतं. त्यानंतर आता त्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत भाष्य केलंं आहे ज्यामुळे काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढण्यची चिन्हं आहेत.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ७ मे च्या दिवशी अर्ध्या तासात आपला पूर्ण पराभव झाला होता. अर्धा तास हवाई युद्ध चाललं त्यात आपली विमानं पाडण्यात आली होती. भारताकडून त्यावेळी एअरफोर्स ग्राऊंड करण्यात आलं. कुणी मान्य करा किंवा करु नका. कुठलंही विमान त्या दिवशी उडलं नाही. ग्वाल्हेर, भटिंडा असेल किंवा सिरसा असेल तिथे कुठेही विमान उडालं नाही. जर या ठिकाणी विमान उडालं असतं तर ते पाकिस्तानने पाडलं असतं असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ज्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.
ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कराची एक किलोमीटरही हालचाल झाली नाही – चव्हाण
१२ लाख सैन्य आहे, २५ लाख सैन्य आहे की १ कोटी सैन्य आहे याला काही अर्थ नाही. कारण युद्धच होणार नाही तुम्हाला कुणी युद्ध करुच देणार नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये हेच आपण पाहिलं. हवाई युद्ध झालं मिसाईल युद्ध झालं. ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कराची एक किलोमीटरही हालचाल झाली नाही. हवाई युद्धं झाली, पुढची युद्धंही तशीच होणार आहेत. मग आपल्याला १२ लाख लष्कर ठेवण्याची काही गरज आहे का? त्यांच्याकडून दुसरं काहीतरी काम करुन घेऊ आपण असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
कारगीलचं युद्ध झालं तेव्हा बिल क्लिटंनचे फोन येत होते की युद्ध थांबवा. आत्ताही ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा ट्रम्पचे फोन येत होते. ट्रम्पनी ते युद्ध थांबवलं आणि आपल्याला काही करता आलं नाही. मोदींनी ते सगळं मान्य केलं कारण आपला पराभव पहिल्या दिवशी झाला होता. लष्कर पुढे जाऊ शकलं नाही कारण अमेरिकेशी असा अलिखित करार झाला आहे की एकमेकांच्या सीमा पार करायच्या नाहीत. त्यामुळे भारतीय लष्कर पुढे जाऊ शकलं नाही. कारगील युद्धाच्या वेळी हा करार झाला होता. ती अट आजही पाळली जाते. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदी जाहीर का केली? मोदींवर नेमका कसला दबाव आहे? ते का म्हणाले नाहीत की आम्ही अजून एक दिवस पाकिस्तानचं नुकसान करणार आहोत. याचं उत्तर सगळ्यांनी शोधलं पाहिजे. आमच्याकडे काही तर्क आहेत पण आमच्याकडे पुरावे नाहीत. पण तर्कांबाबत इतकंच सांगेन मोदींवर सध्या अमेरिकेचा फार मोठा दबाव आहे आणि मोदी हतबल आहेत. परराष्ट्र खात्याची जी पिछेहाट झाली ती कुणाला सांगायची गरज नाही. शिवाय पाकिस्तानला डोनाल्ड ट्रम्प यांनी डोक्यावर बसवलं आहे असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.




