वर्षा पार्टे यांच्या नेतृत्वाखाली इनरव्हील क्लबचा शिक्षणासाठी हातभार; अंजुमन हायस्कूलला शैक्षणिक साहित्याची भेट
महाबळेश्वर इनरव्हील क्लबचा स्तुत्य उपक्रम; अंजुमन हायस्कूलला शैक्षणिक साहित्याची मदत
महाबळेश्वर (प्रतिनिधी)महाबळेश्वर इनरव्हील क्लबच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत येथील ‘अंजुमन खैरुल इस्लाम उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालया’ला शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. या उपक्रमांतर्गत शाळेच्या ग्रंथालयासाठी आवश्यक असलेले कपाट आणि विद्यार्थ्यांसाठी दोनशेहून अधिक वह्या (नोटबुक) सुपूर्त करण्यात आल्या.
शाळेत आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा पार्टे यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले. हे साहित्य शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शबाना असद इम्रान शेख यांनी स्वीकारले.
वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा मानस
या प्रसंगी बोलताना इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा पार्टे यांनी सांगितले की, “शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी आणि त्यांना अभ्यासासाठी पुरेशा शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. समाजोपयोगी आणि शिक्षणाभिमुख प्रकल्प राबविण्याचा आमचा संकल्प असून, भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम निरंतर सुरू राहतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला इनरव्हील क्लबच्या सचिव सपना अरोरा, आदिती भांगडिया, नेहा साळवी, लक्ष्मी येरलागड्डा, ऍड. राधा मुक्कावर यांच्यासह इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका श्रीमती शबाना असद इम्रान शेख यांनी इनरव्हील क्लबच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या शैक्षणिक मदतीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.




