सातारा डायग्नोस्टिक सेंटर मध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
सातारा : नव्व्यानव टक्के कॅल्शियमयुक्त पसरलेला ब्लॉक आणि त्यात रक्तवाहिनी फाटलेली. अशा आव्हानात्मक परिस्थितीत सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीमने प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जटिल शस्त्रक्रिया यशस्वी करून रुग्णाला जीवदान दिले.
सातारा जिल्ह्यातील एका 65 वर्षीय महिलेच्या वारंवार छातीत दुखत होते. इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. जगदीश हिरेमठ यांनी रुग्णाची तपासणी करून रोटाबलेशन अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुरेश शिंदे यांच्या सूचनेनुसार शस्त्रक्रियेची संपूर्ण तयारी करण्यात आली. डॉ. जगदीश हिरेमठ यांच्या नियंत्रणाखाली इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. मधुसूदन आसावा, बायपास सर्जन डॉ. हर्षवर्धन सायगावकर, डॉ. निलेश साबळे व त्यांच्या सहकारी तंत्रज्ञांनी ही शस्त्रक्रिया निर्धोक यशस्वी केली.
रोटाबलेशन अँजिओप्लास्टी करताना रक्तवाहिनीस इजा होऊन रुग्णाच्या जीविताला धोका पोहोचू शकतो. अशा वेळी बायपास सर्जन तेथे उपलब्ध असणे गरजेचे असते. सातारा डायग्नोस्टिक सेंटर मध्ये डॉ. हर्षवर्धन सायगावकर उपलब्ध असल्याने सर्व शक्यता लक्षात घेऊन अत्यंत सुरक्षितपणे ही अँजिओप्लास्टी पार पाडता आली.
या शस्त्रक्रिये विषयी माहिती देताना सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुरेश शिंदे यांनी सांगितले की, रुग्णाच्या हृदयाकडे जाणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीत कॅल्शियमचा अडथळा होता. तो बाजूला ढकलणे कठीण होते. अशावेळी बायपास सर्जरी निवडण्यात येते. रुग्णाचे वय व एकाच रक्तवाहिनीत अडथळा असल्याने याकरिता बायपास सर्जरीचा धोका पत्करण्या ऐवजी रोटाबलेशन अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तपासणीत रुग्णाच्या रक्तवाहिनीचे आवरण फाटले असल्याचे लक्षात आले. फाटलेली रक्तवाहिनी पुन्हा जुळून येण्यासाठी तीन आठवडे थांबावे लागते. मात्र तोपर्यंत रुग्णाच्या जीवितास धोका संभवत होता. डॉ. जगदीश हिरेमठ व त्यांच्या टीमने हा धोका पत्करून रोटाबलेशन अँजिओप्लास्टी यशस्वी केली. आमच्याकडे असलेली अद्ययावत कॅथलॅब, डॉ. हर्षवर्धन सायगावकर आणि बायपास सर्जरीचा असलेला बॅकअप यामुळेच हे शक्य झाल्याचे डॉ. सुरेश शिंदे यांनी स्पष्ट केले.
” रोटाबलेशन अँजिओप्लास्टी या शस्त्रक्रियेनंतर काही दिवसातच रुग्ण स्वतःच्या पायांनी चालत घरी गेला. शस्त्रक्रिये पश्चात उपचारासाठी रुग्ण चालत येताना दिसतो तेव्हा समाधान वाटते”
डॉ. सुरेश शिंदे
व्यवस्थापकीय संचालक
सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल