सिनेअभिनेत्री सौ.कुमुदिनी अदाटे ‘एशियन एक्सलांस अवॉर्ड’ने सन्मानित
सातारा प्रतिनिधी- गोवा बुक ऑफ रेकॉर्डस, इंडिया प्रस्तुत आशियाई कला, सामाजिक संमेलन, गोवा या ठिकाणी पार पडलेल्या सन्मान वितरण सोहळ्यात सिनेअभिनेत्री सौ.कुमुदिनी अदाटे यांना त्यांनी कला आणि चित्रपट जगतात केलेल्या कार्याचा गौरव करताना एशियन एक्सलांस अवॉर्ड’ या पुरस्काराने जलसंपदा सहकार मंत्री श्री.सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांनी कला, नाटक, चित्रपट, मालिका, एकांकिका करत आपल्या अभिनयाने सिनेजगतात चुणूक दाखविलेली आहे.यावेळी सोहळ्यास गोव्यातील अनेक दिग्गजांची उपस्थिती होती.
एशियन आर्ट लिटरेचर अँड सोसायटी यांच्या वतीने हा पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यास प्रदान केला जातो.
सौ.कुमुदिनी यांनी अनेक कला, नाटक, चित्रपट, मालिका, एकांकिका, शॉर्ट फिल्म, टीव्ही सिरीयल मध्ये काम केलेले आहे. ज्या काही छोटया – मोठया भूमिका केल्या त्या रसिक प्रेक्षकांना आवडल्या, नेहमी त्यांच्या पाठी कौतुकाची थाप पडली. याशिवाय त्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारा “अर्थात हा खेळ वहिनींचा” या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या निर्मात्या आहेत. त्याचबरोबर अनेक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निवेदिका म्हणून काम करतात. त्यांच्या या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन सर्वत्र होत आहे.
यावेळी सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, माजी शिक्षण मंत्री प्रकाश वेळीप, कला अकादमीचे माजी संचालक विनायक खेडेकर, आमदार रुडोल्फो फर्नांडिस, चिंबलचे सरपंच पांडे संदेश शिरोडकर आणि उद्योजक दिनेश उघाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बी. एन. खरात यांनी केले होते.