चिमणगावच्या तनिष्क जाधवची ‘एनडीए’त भारतीय वायुसेनेसाठी निवड; लष्करी सेवेची परंपरा राखली
कोरेगाव प्रतिनिधी -कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील सुपुत्र तनिष्क संदीप जाधव याची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) च्या १५६ व्या तुकडीमध्ये ‘भारतीय वायुसेनेत (Indian Air Force) विभागात निवड झाली आहे. तनिष्कने मिळवलेल्या या दैदिप्यमान यशामुळे चिमणगावसह संपूर्ण जिल्ह्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तनिष्क हा नाशिक जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक (DDR) श्री. संदीप उत्तम जाधव यांचा चिरंजीव, तर कै. उत्तम जाधव व ‘शिवशक्ती सहकारी पतसंस्थे’चे संस्थापक श्री. हणमंत साबळे यांचा नातू आहे. तनिष्कच्या कुटुंबाला देशसेवेची मोठी पार्श्वभूमी आहे. त्याचे आजोबा कै. उत्तम जाधव हे सीआरपीएफ मध्ये होते, तर त्याचे चुलते श्री. सचिन जाधव हे सध्या ‘सीआरपीएफ’ (CRPF) मध्ये कार्यरत आहेत. आपल्या आजोबांच्या आणि चुलत्यांच्या देशसेवेचा वारसा पुढे चालवत तनिष्कने अत्यंत खडतर अशा एनडीए परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.तनिष्कचे अकरावी व बारावीचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित ‘सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट’ (SPI) मध्ये झाले. येथील शिस्तबद्ध वातावरण आणि मार्गदर्शनाच्या जोरावर त्याने एनडीएच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवले. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर तनिष्कने वायू दलात भरारी घेण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे. त्याच्या या यशाबद्दल चिमणगाव परिसरातील ग्रामस्थ, जाधव व साबळे परिवाराचे आप्तेष्ट आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्याचे विशेष अभिनंदन व कौतुक केले जात आहे.




