राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी य़ावेळी सांगितले.
यासंदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्या आहेत.
आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल. त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीने, ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सर्दस्य सर्वश्री राम कदम, प्रकाश सुर्वे, श्रीमती देवयानी फरांदे, मनिषा चौधरी आदी सदस्यांनी भाग घेतला.