शीतल तेजवानीला अटक, कोरेगाव पार्कमधील अमेडिया’ कंपनीचे जमीन विक्री प्रकरण
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीच्या कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील ४० एकर जमिनीच्या विक्री प्रकरणात कुलमुखत्यारधार आरोपी शीतल तेजवानी हिला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली. चौकशीत तेजवानीचा सहभाग असल्याचे उघडकीस आल्याने त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात अमेडिया’ कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांना नोटीस बजाविण्यात आली असून, ते अद्याप जबाब नोंदविण्यासाठी हजर राहिलेले नाहीत.
या प्रकरणात हेमंत गवंडे, तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. तेजवानी हिने दिलेल्या जबाबाचे अवलोकन करण्यात आले. या प्रकरणात विविध शासकीय विभागांकडून कागदपत्रे मागविण्यात आली. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर तेजवानी हिचा प्रकरणात सहभाग असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातंर्गत बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. संबंधित जमीन २७५ जणांनी कुलमुख्यारपत्र करुन तेजवानीला दिली. त्याअनुषंगाने तपास करण्यात आल्याचे आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
तेजवानी यांची पुणे पोलिसांनी २० नोव्हेंबर रोजी सलग सहा तास चौकशी केली. ही जमीन महार वतनाची आहे. परंतु, २००६ मध्ये शीतल तेजवानी हिने २७५ व्यक्तींकडून ही जमीन ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ करून घेतली. नंतर २०२५ ला तेजवानी हिने ‘अमेडिया’ कंपनीबरोबर करार करून ती जमीन त्यांना दिली. या जमीन प्रकरणात जूनमध्ये ताबा घेण्याचादेखील प्रयत्न झाला होता.
या प्रकरणात नेमका व्यवहार काय झाला, या अनुषंगाने पुणे पोलिसांनी तपास केला. संबंधित व्यक्तींकडून ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ करून घेताना मोबदला दिला का, कशाच्या आधारावर ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ केली, ‘अमेडिया’ कंपनीबरोबर व्यवहार कशा पद्धतीने झाला, या अनुषंगाने ही चौकशी करण्यात आली. या संदर्भातील कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.




