Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बस प्रवासात महिलेला गुंगीकारक औषध देऊन लुटणारा आरोपी जेरबंद, महाबळेश्वर पोलिसांची कारवाई; ३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

बस प्रवासात महिलेला गुंगीकारक औषध देऊन लुटणारा आरोपी जेरबंद, महाबळेश्वर पोलिसांची कारवाई; ३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

बस प्रवासात महिलेला गुंगीकारक औषध देऊन लुटणारा आरोपी जेरबंद, महाबळेश्वर पोलिसांची कारवाई; ३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

महाबळेश्वर प्रतिनिधी -बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेला गुंगीकारक औषध देऊन तिची लूट करणाऱ्या आरोपीला महाबळेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 दि. २८ एप्रिल रोजी दुपारी ३.३० ते सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सातारा ते महाबळेश्वर या एस.टी. बसमध्ये ही घटना घडली. आरोपी सतीश रामभाऊ बोन्हाडे उर्फ संदीप याने ‘लोन मिळवून देतो’ असा बहाणा करून संबंधित महिलेशी ओळख वाढवली व तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पिण्याच्या पाण्यात गुंगीकारक पदार्थ देऊन तिला बेशुद्ध केले. यानंतर तिच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र व व्हिवो कंपनीचा मोबाईल असा एकूण सुमारे १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

या प्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर यांनी तपास सुरू केला.

तपासादरम्यान महाबळेश्वर व सातारा येथील एस.टी. स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. त्यानंतर पुण्यातील खराडी परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून सुमारे ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती काळे, पोलीस नाईक अतुल जाधव, पोलीस नाईक अमोल पवार, पोलीस हवालदार जगताप, पोलीस कॉन्स्टेबल सलीम सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल जगताप, पोलीस कॉन्स्टेबल शंकर गलांडे व पोलीस कॉन्स्टेबल वैभव भिलारे यांनी सहभाग घेतला.

अटक आरोपीला महाबळेश्वर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने करत आहेत.

दरम्यान, अशा प्रकारच्या घटना इतरत्र घडल्यास नागरिकांनी तात्काळ महाबळेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तीकडून दिले जाणारे अन्न-पाणी किंवा इतर वस्तू स्वीकारू नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket