धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी भाजपची एकजूट; साताऱ्यात प्रचार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारा : सांगली–सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील विठ्ठल मंगलम कार्यालय येथे आयोजित बैठकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील ज्ञानदेव कदम यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी संघटनात्मक नियोजन, प्रचाराची दिशा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसोबत समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस सातारा-जावली, वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य तसेच भाजप व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यानंतर धैर्यशील कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य मेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्यास खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, सदाभाऊ सपकाळ, मदनदादा भोसले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले, सदस्य वसंतराव मानकुरे, सुनील काटकर, शशिदादा पिसाळ, सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, वाई नगरपालिकेचे नगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक अविनाश कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणाताई पिसाळ यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांनी गुरुवार, दि. १८ जून २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात महायुतीचे उमेदवार धैर्यशील ज्ञानदेव कदम यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.




