भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, मौजे भिलार येतील घटना
बिबट्याला मिळाले जीवदान….
सातारा :28 ऑक्टोबर रोजी रोजी मौजे भिलार ता. महाबळेश्वर येथे मालकी क्षेत्रातील अंदाजे ३५ फुट खोल विहीरीमध्ये वन्यप्राणी बिबट पडल्याचे समजल्यावर त्वरीत वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तसेच सोबत जेनीस स्मिथ एनिमल वेलफेअर ट्रस्ट, पाचगणी व स्थानिक प्राणी मित्र यांच्या मदतीने लाकडी शिडी व दोरी च्या सहाय्याने वन्यप्राणी बिबट्याला किमान एक ते दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर सुस्थितीत बाहेर काढून नजीकच्या नैसर्गिक अधिवासात जाण्यासाठी जागा खुली करून दिली.
सदर वन्यप्राणी बिबट्याला विहीरीतून बाहेर काढणेसाठी स्थानिक रेस्क्यू टीम तसेच प्राणीमित्र व पर्यावरणप्रेमी आणि भिलार ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वन्यप्राणी बिबट नजीकच्या डोंगर क्षेत्रात सुस्थितीत निघून गेला. वनाधिकारी यांनी सर्व ग्रामस्थांना वन्यप्राणी बिबट बाबत जनजागृती करून सावधान राहणेचे आवाहन केले.
मा. उपवनसंरक्षक श्रीमती. आदिती भारद्वाज मॅडम, मा. सहाय्यक वनसंरक्षक सातारा श्री. प्रदीप रौंधळ, मा. वनक्षेत्रपाल महाबळेश्वर श्री. गणेश महांगडे यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कार्यवाही मा. वनपरिमंडळ अधिकारी गुरेघर श्री. आर.व्ही. काकडे व वनरक्षक गुरेघर श्री. वैभव अशोक शिंदे, वनसेवक श्री. संजय भिलारे, कर्मचारी श्री. साहेबराव पार्टे व श्री. अनिकेत सपकाळ तसेच स्थानिक रेस्क्यू टीम, निसर्गमित्र यांनी पार पडली.