भरतनाट्यम हे ईश्वराशी जोडणारे सात्विक नृत्यशास्त्र : अरूंधती पटवर्धन
वाईमध्ये प्रथमच “सर्व देवाय नमः” अरंगेत्रम् कार्यक्रम संपन्न दोन अडीच हजार वर्षांपूर्वी मंदिरांमधून उगम पावलेले आणि ब्रह्मदेवांनी भरत ऋषींच्या करवी प्रगट केलेले भरतनाट्यम हे भक्ताला ईश्वराशी जोडणारे सात्विक नृत्यशास्त्र आहे. भरतनाट्यम या संस्कृत शब्दाचा अर्थ भाव, राग आणि ताल व्यक्त करणारे नृत्य असा होतो. असे उद्गार प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना आणि कलावर्धिनी डान्स कंपनीच्या प्रणेत्या अरुंधतीताई पटवर्धन यांनी वाई येथे पहिल्यांदाच आयोजित झालेल्या अरंगेत्रम् कार्यक्रमात बोलताना काढले. त्या पुढे म्हणाल्या, या शास्त्राला पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हे या कलेतील सर्व जाणकारांचे कर्तव्य आहे. कलावर्धिनी ही संस्था याचसाठी समर्पित आहे. आदरणीय डॉ. सुचिता भिडे चापेकर यांनी गेल्या पन्नास वर्षात या कलेच्या जतनाचे आणि संवर्धनाचे मोठे काम केलेले आहे.
अनेक वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर वाईतील भरतनाट्यम शिकणाऱ्या अवनी देशपांडे, राधा ढेकाणे, वेदिका चिकणे, प्रणाली भुतकर, जान्हवी जगदाळे व दिया बाचल यांनी कलावर्धिनी संस्थेतर्फे “सर्व देवाय नमः” हा अरंगेत्रम् कार्यक्रम अत्यंत बहारदारपणे सादर केला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि संस्कार भारती सातारा जिल्ह्याच्या नृत्यविधा प्रमुख नेहा भिडे घाडगे म्हणाल्या, आपण सर्व कलाकारांनी आयुष्यात कुठलेही करिअर करा; परंतु या भरतनाट्यम कलेची आराधना नक्कीच करत रहा.असे आवाहन त्यांनी केले. त्या म्हणाल्या, ही कला आपल्या शरीराला व्यायाम आणि मनाला तजेला, समाधान, आनंद भरभरून देत राहील.
तीन तासाच्या या बहारदार शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमात पुष्पांजली,आलारिपु,जतीस्वरम् ,वर्णम् , पदम् आणि तिल्लाना या रचनांचे सादरीकरण अप्रतिम होते. सुरुवातीला पुष्पांजलीने रंगदेवतेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्री गणेशाला वंदन करून अलारिपू आणि जतीस्वरम् या स्वरांवर नृत्ताची रचना सादर केली गेली. वर्णम् सादरीकरणात कृष्णाची विविध रूपे बघायला मिळाली. पदम् या भरतनाट्यमच्या मार्गम् मधील अभिनयाच्या रचनेत शिव आणि कृष्ण या दोन देवतांवर पदम् सादर केली गेली. तिल्लाना अर्थात शुद्ध नर्तन म्हणजेच नृत्त. कुठलाही विशिष्ट भावना दाखवता रेषा आकार आकृती यातून सुंदर अशी नक्षी जमिनीवर आणि अवकाश यामध्ये अवकाशात निर्माण करणारी रचना. आनंदाचे उत्स्फूर्त असे नृत्य स्वरूप असलेल्या तिल्लानाने कार्यक्रमाला उत्कटतेचा कळस चढवला. कान्हा,यशोदा गवळणीं मधील संवाद खूपच बोलका होता. मंगलम् रचनेत शांती मंत्राने कार्यक्रमाचे सांगता झाली.
वाईतील नृत्य मार्गदर्शिका ऋचा ताई खरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उत्कृष्ट अशी प्रकाश योजना सुश्रुत जोशी, रंगभूषा रेश्मा तांबे, वेशभूषा गुलाम टेलर, रंगावली अभया मांढरे आणि छायाचित्रण केदार गोडबोले यांनी केले.
कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने वाईकर शास्त्रीय नृत्य रसिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.