भारताला महासत्ता बनविण्यासाठी महिलांचे योगदान महत्वपूर्ण-इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे
भोळी येथे महिला दिन उत्साहात साजरा
खंडाळा : भारताच्या इतिहासात अनेक मनस्विनींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. भारतीय स्त्री कणखरपणे लढल्याची अनेक उदाहरणे आहेत त्यामुळे ती कधीही अबला नव्हती. भारतीय संस्कृतीत महिलांना नेहमीच विशिष्ट दर्जा देण्यात आला आहे. पुरातन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत स्त्रीयांनी वैशिष्टयपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे भारताला महासत्ता बनविण्यात स्त्रीयांचा वाटा मोलाचा राहील असे मत इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांनी व्यक्त केले.
भोळी ता. खंडाळा येथे ग्रामस्थ महिला मंडळ व प्राथमिक विद्यालयाच्या वतीन आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात ‘ जागर स्त्री शक्तीचा ‘ या विषयावर ते बोलत होते. यावेळी मोकळा श्वास संस्थेच्या अध्यक्षा सपना भोसले, उदयोजक प्रमोद चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, हर्षदा सावंत, डॉ. शिल्पा राठी, रोहिणी साळुंखे, स्नेहल गायकवाड, सुस्मिता गायकवाड, सरपंच प्रशांत खुंटे, उपसरपंच मोनिका चव्हाण, पद्मा चव्हाण, मुख्याध्यापक मनोज रामगुडे, महेश चव्हाण, हेमंत चव्हाण, अनंत चव्हाण यासह प्रमुख उपस्थित होते.
इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील स्त्रीयांना मराठयांच्या देव्हाऱ्यातील देवतेचा मान दिला. महिलांचा आदर राखला. भारताच्या इतिहासात राजमाता जिजाऊ , महाराणी येसूबाई , महाराणी ताराबाई , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर , ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, लक्ष्मीबाई पाटील यांच्यापासून ते अलिकडच्या काळात इंदिरा गांधी, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, प्रतिभाताई पाटील, सिंधुताई सपकाळ, कल्पना चावला यांच्यापर्यंत असंख्य स्त्रीयांनी कर्तृत्वाची मोहोर उमटवली.
वास्तविक आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. मात्र अनेक क्षेत्र अशी आहेत जिथे स्त्रीयांनी उठावदार कामगिरी केली आहे. आजवर केवळ कुटुंबापुरती मर्यादित असणारी स्त्री देशाच्या राज्यकारभाराची प्रमुख हिस्सा बनलेली आहे. यामागे इतिहासातील अनेक स्त्रियांच्या कार्याची प्रेरणा आहे. स्त्रीमध्ये नवनिर्मितीची क्षमता आहे त्यामुळे भारताला उद्यमशील बनविण्यात महिलांचा मोठा वाटा आहे. उदयाचे भारताचे महासत्ता बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी महिलांचे योगदान महत्वपूर्ण राहणार आहे.
स्वागत मनोज रामगुडे यांनी केले तर संतोष नेवसे यांनी आभार मानले.
