वाई फेस्टिवल २०२४ अंतर्गत आयोजित टॅलेंट हंट स्पर्धेला युवा वर्गासह सर्व वयोगटातील स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद
वाई प्रतिनिधी -वाई फेस्टिवल २०२४ अंतर्गत आयोजित टॅलेंट हंट स्पर्धेला युवा वर्गासह सर्व वयोगटातील स्पर्धकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. १४ डिसेंबर २०२४ रोजी सत्यवती जोशी सभागृह वाई येथे स्पर्धा संपन्न झाली. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांनी गाणं, नृत्य, अभिनय, वक्तृत्व, ब्लाइंड फोल्ड, क्युब सोल्व्हिंग अशा विविध प्रकारांमध्ये स्पर्धकांनी आपले कौशल्य सादर केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन ॲड प्रभाकर लक्ष्मण सोनपाटकी, ( निर्वाचित सदस्य – महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ) यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. ज्या उद्देशाने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने सत्यवती जोशी सभागृह उभारले आहे त्याचा उद्देश वाई फेस्टिवल च्या माध्यामातून नक्कीच सफल होतोय व याच सभागृहातून कलाकार तयार होतील याबाबत त्यांनी खात्री याप्रसंगी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. या स्पर्धेचे परीक्षण श्री दीपक बिडकर संस्थापक – रुद्रांश अकॅडमी कोल्हापूर) , श्री अनिरुद्ध (उमेश) नेरकर ( ज्येष्ठ संगीतकार) , सिने अभिनेत्री पायल पांडे ( सांगली ), व वाई मधील रंगकर्मी श्री सचिन अनपट ( अध्यक्ष – प्रतिक थीएटर, वाई) यांनी केले. वाई फेस्टिवलच्या माध्यमातून अनेक उपक्रम आजवर राबविले गेले आहेत, मात्र प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची कला असू शकते आणि त्या सर्व कलांना एकाच वेळी व्यासपीठ उपलब्ध करून देणं हि खूप मोठी गोष्ट आहे आणि हे काम वाई फेस्टिवलच्या माध्यमातून केलं जात आहे यासाठी आयोजकांचे विशेष आभार स्पर्धेचे मुख्य परीक्षक श्री दीपक बिडकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
स्पर्धे दरम्यान रंगलेल्या सादरीकरणांमुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. गाण्यांमध्ये आवाजाचा गोडवा आणि नृत्यातील लयबद्धतेने रसिकांना खिळवून ठेवले, तर डोळ्यावर पट्टी बांधून कार्ड चे नंबर व रंग ओळखून उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत विजेते ठरलेले स्पर्धक यांना वाई फेस्टिवल च्या भव्य व्यासपीठावर त्यांची कला सादर करण्याची संधी मिळणार असल्याचे वाई फेस्टिवल चे निमंत्रक श्री अमर कोल्हापुरे यांनी सांगितले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक केले आणि वाई फेस्टिवलने तरुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदन केले.
याप्रसंगी उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे , फेस्टिवलचे अध्यक्ष श्री शरद चव्हाण, कोषाध्यक्ष ॲड रमेश यादव , सचिव श्री सुनील शिंदे , निमंत्रक श्री अमर कोल्हापुरे , सदस्य श्री वैभव फुले , श्री नितीन वाघचौडे , श्री संजय वाईकर , श्री अमीर बागुल , श्री भूषण तारू , डॉ मंगला अहिवळे , सौ प्रीती कोल्हापुरे , श्री श्रीकांत शिंदे , व उत्कर्ष पतसंस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.