यशोदा पब्लिक स्कूलमध्ये बालवैष्णवांचा महामेळा; दिंडी सोहळ्यातून विठ्ठल भक्तीचा जागर
सातारा प्रतिनिधी -आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा पब्लिक स्कूल, सातारा येथे पारंपरिक वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविणारा दिंडी सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहाने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सावता माळी, संत जनाबाई आदी संतांच्या वेशभूषेत सहभागी होत संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंग आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात साकारलेला हा बालवैष्णवांचा महामेळा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे, विश्वस्त आर्किटेक्ट डॉ. स्वराली सगरे, संजय शेलार,राजेंद्र यादव तसेच यशोदा पब्लिक स्कूलच्या प्राचार्या अमिता डोगरा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. दशरथ सगरे म्हणाले, “वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून ती समता, बंधुभाव, शिस्त, सेवा आणि संस्कार यांचे विद्यापीठ आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगत आधुनिक शिक्षणासोबत भारतीय परंपरा आणि मूल्यांचा वारसा जपला पाहिजे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्म, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय संस्कार दृढ होतात.”
आर्किटेक्ट डॉ. स्वराली सगरे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या दिंडी सोहळ्याचे कौतुक करत सांगितले की, “भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन हे शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे. विद्यार्थ्यांनी आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा केलेला हा दिंडी सोहळा त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.”
यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या पालखीचे वहन करत टाळ, मृदंग आणि फुगड्यांच्या साथीने अभंग गात दिंडी काढली. “ज्ञानोबा-तुकोबा”, “पांडुरंग हरी” आणि “विठ्ठल विठ्ठल” या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. पारंपरिक वेशभूषा, वारकरी फेटे, तुळशीच्या माळा आणि भगव्या पताका यांमुळे दिंडीला आगळेवेगळे सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले.
प्राचार्या अमिता डोगरा यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करत सांगितले की, शालेय शिक्षणासोबत भारतीय संस्कृती, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी यशोदा पब्लिक स्कूलमध्ये वर्षभर विविध सांस्कृतिक आणि मूल्याधिष्ठित उपक्रमांचे आयोजन केले जाते. दिंडी सोहळ्यासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना संस्कारक्षम आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनीही मोलाचे सहकार्य केले. भक्ती, संस्कार आणि भारतीय परंपरेचे सुंदर दर्शन घडविणारा हा बालवैष्णवांचा महामेळा उपस्थितांच्या मनात भक्तीची आणि संस्कृतीची अविस्मरणीय छाप उमटवून गेला. यशोदा पब्लिक स्कूलचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना आपल्या सांस्कृतिक वारशाशी जोडणारा आणि वारकरी परंपरेतील समता, सेवा व सद्भावनेचे मूल्य रुजविणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.





